उत्तर भारतात श्रावण महिना समाप्त झाला असून, तिथे आता मासे खरेदी करण्यासाठी खवय्यांची झुंबड उडत आहे. दरम्यान उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथे मासे खरेदी करण्यासाठी आलेल्या दोन गटांमध्ये वाद होऊन तुफान राडा झाला. यावेळी दोन्हीकडच्या लोकांना एकमेकांना लाथाबुक्क्यांनी बदडून काढले. हा संपूर्ण प्रकार राष्ट्रीय महामार्गावर घडला. त्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. आता या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ही घटना शनिवारी संध्याकाळी घडली. नेपाळकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील पीपीगंज बाजारामध्ये असलेल्या एका माशांचा दुकानात कोल्हुआ येथील मुकेश कुमार चौहान आणि भगवानपूर येथील रितिक चौहान हे आले होते. दोघांनीही प्रत्येकी ५ किलो रोहू माशांची ऑर्डर दिली होती. मात्र दुकानदाराकडे केवळ चार किलो मासेच उरले होते. त्यावरून सुरुवातीला बाचाबाची झाली आणि नंतर प्रकरण धक्काबुक्कीपर्यंत गेले.
यावेळी दुकानदाराने या दोघांनाही मासे अर्धे अर्घे वाटून घेण्याचा किंवा दुसऱ्या दुकानातून खरेदी करण्याचा सल्ला दिला होता. मात्र दोन्ही बाजू ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. पाहता पाहता प्रकरण हाणामारीपर्यंत गेले. दोघांनी आपापल्या मित्रपरिचितांना बोलावून घेतले. त्यानंतर शिविगाळ, मारामारीला सुरुवात झाली. एकमेकांचे कपडे फाडले गेले. हा संपूर्ण प्रकार भरस्त्यात झाल्याने दोन्हीकडे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. काही लोकांनी या घटनेचा व्हिडीओ चित्रित करून सोशल मीडियावर टाकला. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.