Uttar Pradesh Crime :उत्तर प्रदेश एसटीएफने सोमवारी(20 जानेवारी) रात्री शामली जिल्ह्यात मोठी कारवाई केली. एसटीएफने 4 कुख्यात गुंडांना चकमकीत ठार केले असून, पोलीस निरीक्षक सुनील दत्त यांनाही गोळी लागली आहे. गंभीर अवस्थेत त्यांना गुरुग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ठार झालेल्या गुंडांकडून एक कार आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. चकमकीच्या ठिकाणाचे काही फोटो समोर आले आहे, जे खूपच भयंकर आहेत.
रात्री सुमारे 30 मिनिटे चकमक चालली
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री शामलीच्या झिंझाना पोलीस स्टेशन परिसरात यूपी एसटीएफ आणि कुख्यात मुस्तफा काग्गा टोळीच्या सदस्यांमध्ये चकमक झाली. एसटीएफला पाहताच गुडांनी गोळीबार सुरू केला. पोलिसांनाही प्रत्युत्तर द्यावे लागले. एसटीएफ आणि हल्लेखोरांमध्ये सुमारे 30 मिनिटे चकमक चालली. यावेळी दोन्ही बाजूंनी डझनभर गोळ्या झाडण्यात आल्या. यामध्ये एसटीएफचे निरीक्षक सुनील दत्त यांना अनेक गोळ्या लागल्या होत्या. मात्र, अखेर एसटीएफने चारही हल्लेखोरांना चकमकीत ठार केले.
एसटीएफने मारलेले सर्व मुस्तफा काग्गा टोळीशी संबंधित होते. अर्शद नावाचा कुख्यात गुन्हेगारही चकमकीत मारला गेला आहे. अर्शदवर एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. अर्शदवर खून, दरोडा असे 17 हून अधिक गंभीर खटले प्रलंबित आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरुन पिस्तूल, देशी बनावटीच्या रायफल, काडतुसे आदी साहित्य जप्त केले आहे. ठार झालेल्या गुन्हेगारांमध्ये टोळीतील प्रमुख सदस्य अर्शद, मनजीत, सतीश आणि एका अनोळखी व्यक्तीचा समावेश आहे.