तुम्हा सगळ्यांना चपलेनं मारेन; भाजपा आमदाराची अधिकाऱ्यांना धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 15:51 IST2020-05-13T15:45:54+5:302020-05-13T15:51:04+5:30
शेतकऱ्यांकडून कमिशन मागणाऱ्या अधिकाऱ्यांना भाजपा आमदाराची धमकी

तुम्हा सगळ्यांना चपलेनं मारेन; भाजपा आमदाराची अधिकाऱ्यांना धमकी
महोबा: उत्तर प्रदेशच्या महोबा जिल्ह्यातल्या भाजपा आमदारानं अधिकाऱ्यांना चपलेनं मारण्याची धमकी दिली आहे. ब्रजभूषण राजपूत असं या आमदाराचं नाव आहे. याआधी राजपूत यांनी महोबा जिल्ह्याचे डीएम आणि एसपींना चोर, दलाल म्हणून वाद निर्माण केला होता. त्यानंतर आता राजपूत यांनी अधिकाऱ्यांना जाहीरपणे जोडे मारण्याची धमकी दिली आहे.
दोन महिन्यांपूर्वी आमदार ब्रजभूषण राजपूत वेश बदलून गहू खरेदी केंद्रावर गेले होते. तिथे त्यांनी आपल्याला गहू विकायचा असल्याचं सांगितलं. त्यावेळी खरेदी केंद्राचा प्रभारी असलेल्या व्यक्तीनं लाच मागितली. या घटनेचं राजपूत यांनी स्टिंग ऑपरेशन केलं. हा व्हिडीओ जारी करत असताना राजपूत यांचा स्वत:च्या जीभेवरील ताबा सुटला. त्यांनी अधिकाऱ्यांना चपलेनं मारण्याची धमकी दिली.
'अशा प्रकारचं वर्तन खपवून घेणार नाही. मी तुम्हाला चपलेनं मारेन. अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून पैसे घेतल्यास मी माझ्या चपलेनं यांची धुलाई करेन. माझ्याविरोधात गुन्हा दाखल करायचा असल्यास बिनधास्त करा,' असं राजपूत म्हणाले. 'माझ्या शेतकऱ्याकडे पैसे मागितले, त्याचं शोषण केलं, तर प्रत्येक अधिकाऱ्याचा अपमान होईल. त्याला चपलेनं मारेन. मग तो अधिकारी पैसे मागताना नक्की विचार करेल,' असं राजपूत यांनी म्हटलं आहे.