UPSC पास झाल्याचा आनंद; उत्तम भारद्वाजने वाटली मिठाई; सत्य समोर येताच रुग्णालयात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 09:16 IST2022-06-02T09:16:08+5:302022-06-02T09:16:53+5:30
वाचा नक्की काय घडलं...

UPSC पास झाल्याचा आनंद; उत्तम भारद्वाजने वाटली मिठाई; सत्य समोर येताच रुग्णालयात दाखल
UPSC परीक्षेचा निकाल ३० मे रोजी जाहीर झाला. निकाल जाहीर झाल्यानंतर काही उमेदवारांच्या चेहऱ्यावर आनंद तर काहींच्या चेहऱ्यावर निराशा दिसत आहे. पण बुलंदशहरचे रहिवासी उत्तम भारद्वाज (Uttam Bhardwaj) त्यांच्या एका चुकीमुळे हॉस्पिटलमध्ये पोहोचले. खरं तर, आपला रोल नंबर आणि वडिलांचे नाव न पाहता उत्तम भारद्वाज यांनी आपण आयएएस झाल्याचं संपूर्ण कुटुंबासह मीडियाला सांगितलं. यूपीएससी परीक्षेच्या १२१ वा क्रमांक मिळवून परीक्षा उत्तीर्ण झाल्याचं त्यांनी सर्वांना सांगितलं.
निकाल उत्तम भारद्वाज यांच्या कुटुंबीयांनीही आनंदही साजरा केला. कुटुंबीयांनी संपूर्ण परिसरात मिठाई वाटून मुलगा आयएएस झाल्याची आनंदाची बातमी सर्वांना दिली. ही बातमी पसरताच उत्तम भारद्वाज यांचे अभिनंदन करणाऱ्यांची झुंबड उडाली. हे सर्व २४ तास सुरू होतं. मात्र २४ तासांनंतर जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली. UPSC परीक्षा बुलंदशहरच्या उत्तम भारद्वाजने नाही, तर हरियाणाच्या सोनीपत येथील उत्तम भारद्वाज या विद्यार्थ्याने उत्तीर्ण केली होती.
रिपोर्टनुसार हा गोंधळ रोल नंबरमुळे झाला. जेव्हा उत्तम भारद्वाज यांनी रोल नंबर टाकला तेव्हा आपल्याला हे यश मिळाल्याचं त्यांना वाटलं.परंतु नंतर नंतर हरयाणाच्या एका विद्यार्थ्यानं यावर दावा केला, तेव्हा उत्तम यांना धक्का बसला. बुलंदशहरच्या उत्तम भारद्वाज यांचा रोल नंबर ३५१६८९४ आहे, तर हरयाणातील उत्तम भारद्वाज यांचा नंबर ३५१६८९१ हा आहे.
परराष्ट्र मंत्रालयात नियुक्तीवर
उत्तम भारद्वाज मूळचे बुलंदशहर जिल्ह्यातील देवीपुरा येथील आहेत. सध्या ते दिल्लीत परराष्ट्र मंत्रालयात सहाय्यक विभाग अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. उत्तमचे वडील नवीन कुमार शर्मा हे विद्युत विभागात कार्यकारी अभियंता आहेत आणि सध्या ते मुरादाबाद येथे कार्यरत आहेत. उत्तम भारद्वाज यांचा यूपीएससी परीक्षेतील हा पहिलाच प्रयत्न होता.
रुग्णालयात दाखल
सत्य समोर आल्यानंतर त्यांना धक्का बसला आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रिपोर्ट्सनुसार त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. सध्या त्यांची प्रकृती ठीक आहे. दरम्यान, यानंतर त्यांनी एक पत्र लिहून या प्रकरणी माफीही मागितली आहे.