खाद्यतेल १०% कमी वापरा, पंतप्रधानांनी लठ्ठपणावर नागरिकांना दिला आरोग्यमंत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 10:17 IST2025-02-24T10:17:26+5:302025-02-24T10:17:36+5:30
मुले लठ्ठ होण्याचे प्रमाण चारपटींनी वाढले

खाद्यतेल १०% कमी वापरा, पंतप्रधानांनी लठ्ठपणावर नागरिकांना दिला आरोग्यमंत्र
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : जगभरात लठ्ठपणाची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, आज प्रत्येक आठवी व्यक्ती लठ्ठपणामुळे त्रस्त आहे. गेल्या काही वर्षांत लठ्ठपणाची प्रकरणे दुपटीने वाढली आहेत. मुले लठ्ठ होण्याचे प्रमाण चारपटींनी वाढले आहे, जे आणखी चिंतेचे कारण असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना लठ्ठपणावर मात करण्यासाठी खाद्यतेलाचा वापर १० टक्क्यांनी कमी करण्याचे आवाहन केले आहे.
त्यांच्या ‘मन की बात’ या मासिक रेडिओ कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, लठ्ठपणा सध्या जगाची एक मोठी समस्या झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) आकडेवारीचा हवाला देऊन पंतप्रधान म्हणाले की, २०२२ मध्ये जगभरात सुमारे २५० कोटी लोकांचे वजन गरजेपेक्षा जास्त होते. हे आकडे अतिशय गंभीर आहेत आणि यावर विचार करणे गरजेचे आहे, असे मोदी म्हणाले.
अधिक वजन किंवा लठ्ठपणा विविध आजारांना आमंत्रण देतो. मात्र सर्वांनी एकत्र येऊन छोटे-छोटे बदल केले, तर या समस्येवर नियंत्रण मिळवता येऊ शकते.
असा सांगितला उपाय
मोदींनी सांगितले की, खाद्यतेलाच्या वापरात १०% कपात करा. तुम्ही ठरवा की, दरमहा स्वयंपाकासाठी १० टक्के कमी तेल वापरायचे. खरेदी करतानाच १०% तेल कमी खरेदी करायचे.
तेलाचा वापर १० टक्क्यांनी कमी करण्यासोबतच मोदी म्हणाले की, त्यांनी १० लोकांना असे करण्याची विनंती करावी आणि त्यानंतर त्या १० लोकांनी इतर १० लोकांना तसे करण्यास सांगावे.
अधिक तेलाने हृदयविकार, मधुमेह आणि तणाव
कार्यक्रमात त्यांनी ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा आणि बॉक्सिंगपटू निखत जरीन यांचे ऑडिओ संदेशही प्रेक्षकांना ऐकवले. यात त्यांनी लठ्ठपणावर नियंत्रण ठेवण्यासाठी नागरिकांना प्रेरित केले.
आहारात तेलाचा कमी वापर आणि लठ्ठपणावर नियंत्रण ठेवणे ही केवळ वैयक्तिक निवड नसून कुटुंबाप्रति आपली जबाबदारीही आहे. आहारात जास्त तेल वापरल्याने हृदयविकार, मधुमेह आणि मानसिक तणाव यासारख्या गंभीर आजारांना आमंत्रण मिळते. आहारात छोटे बदल करून आपण आपले भविष्य निरोगी, सक्षम आणि आजारमुक्त करू शकतो.
विद्यार्थ्यांना संदेश...
ताण न घेता परीक्षा द्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आणि कोणत्याही तणावाशिवाय आणि सकारात्मक विचाराने परीक्षा देण्याचा संदेश दिला. ही बोर्ड परीक्षांची वेळ आहे. कोणताही तणाव न घेता आणि पूर्ण सकारात्मकतेने परीक्षा द्या.
काही नेते धर्माची खिल्ली उडवत आहेत
छतरपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांना विरोध करणाऱ्यांवर टीका केली आणि प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभाला ‘एकतेचा महाकुंभ’ असे म्हटले.
मध्य प्रदेशातील छतरपूर येथे बागेश्वर धाम वैद्यकीय आणि विज्ञान संशोधन केंद्र आणि कर्करोग रुग्णालयाचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान लोकांना संबोधित करत होते. ते म्हणाले की, नेत्यांच्या एका वर्गाने धर्माची खिल्ली उडवली आहे.
अनेक वेळा परकीय शक्ती या लोकांना पाठिंबा देऊन धर्म कमकुवत करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. हिंदू धर्माचा द्वेष करणारे लोक शतकानुशतके कोणत्या ना कोणत्या वेषात जगत आहेत. गुलामगिरीच्या मानसिकतेने अडकलेले हे लोक आपल्या मठ-मंदिरांवर, संतांवर, संस्कृतीवर आणि तत्त्वज्ञानावर वारंवार हल्ले करत असतात.