नोबेल विजेत्या US अध्यक्षाने महाराष्ट्रात बांधली होती १०० घरे; भारताकडून हवी होती अणुचाचणी बंदी करारावर स्वाक्षरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 10:49 IST2024-12-31T10:49:30+5:302024-12-31T10:49:54+5:30
कार्टर यांनी लाेणावळाजवळच्या पाटण या गावात १०० स्वयंसेवकांसाठी घरे बांधण्यास मदत केली हाेती...

नोबेल विजेत्या US अध्यक्षाने महाराष्ट्रात बांधली होती १०० घरे; भारताकडून हवी होती अणुचाचणी बंदी करारावर स्वाक्षरी
नवी दिल्ली : अमेरिकेचे माजी अध्यक्ष जिमी कार्टर यांचे दीर्घ आजारानंतर निधन झाले. आयुष्याची १०० वर्षे पूर्ण करणारे कार्टर हे लाेणावळाजवळच्या १०० कुटुंबीयांसाठी देवदूतच ठरले. वर्ष २००६ मध्ये कार्टर यांनी या कामगार कुटुंबीयांचे स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यास माेठी मदत केली हाेती.
कार्टर यांनी लाेणावळाजवळच्या पाटण या गावात १०० स्वयंसेवकांसाठी घरे बांधण्यास मदत केली हाेती. ‘हॅबिटॅट फाॅर ह्युमॅनिटी’च्या माध्यमातून ही घरे बांधण्यात आली हाेती. त्यात हाॅलिवूड अभिनेता ब्रॅड पिट आणि बाॅलिवूड अभिनेता जाॅन अब्राहम यांचेही याेगदान हाेते. २००६ मध्ये कार्टर व त्यांची पत्नी राेजलीन यांनी आठवडाभर तेथे मुक्काम केला हाेता. त्यावेळी २ हजारांपेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय व स्थानिक स्वयंसेवकांची उपस्थिती हाेती. कार्टर हे स्वत: सुतारकामात निपुण हाेते. या काैशल्याचा वापर त्यांनी संघटनेची प्रतिमा निर्माण करण्यासाठी केला.
भारताने अण्वस्त्रे बनविण्यास हाेता विराेध
कार्टर हे भारतात आले हाेते त्यावेळी त्यांना विश्वास हाेता की, सर्वसमावेशक अणुचाचणी बंदीच्या करारावर भारताची स्वाक्षरी मिळवून भारताच्या अण्वस्त्र सज्जतेचा मार्ग बंद करतील. मात्र, तसे झाले नाही. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान माेरारजी देसाई यांनी त्यांच्यासमाेर अशा अटी ठेवल्या की, ज्या पूर्ण करणे अमेरिकेला आजही अशक्यच आहे.
भारतात कार्टर यांच्या नावाने गाव
जिमी कार्टर यांच्या नावाने हरयाणात एका गावाचे नावदेखील ठेवण्यात आले आहे. गुरगावजवळच्या दाैलतपूर नशिराबाद या गावाचे कार्टरपुरी असे हे नाव ठेवण्यात आले हाेते. ३ जानेवारी १९७८ राेजी ते या गावात गेले हाेते. ही भेट अतिशय संस्मरणीय ठरली हाेती. या गावात ३ जानेवारी राेजी सार्वजनिक सुट्टी असते.
यासाठी मिळाला शांततेचा नाेबेल
- जिमी कार्टर यांनी आखातात अभूतपूर्व शांतता करार घडवून आणला हाेता. १९७८मध्ये इजिप्तचे तत्कालीन राष्ट्रपती अन्वर सादात आणि इस्रायलचे तत्कालीन पंतप्रधान मेनाचेम बेगिन यांच्यात शांतता करार झाला हाेता.
- ‘कॅंप डेव्हिड करार’ या नावाने ताे ओळखला जाताे. त्यानंतर कार्टर यांची शांततेचे समर्थक नेते म्हणून प्रतीमा निर्माण झाली. यासाठी त्यांना शांततेचा नाेबेल देण्यात आला होता.