कष्टाचं फळ! ग्रॅज्युएशनमध्ये नापास पण हार नाही मानली; मेहनतीने झाला IAS ऑफिसर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2024 16:24 IST2024-04-15T16:11:05+5:302024-04-15T16:24:17+5:30
ग्रॅज्युएशनमध्ये नापास झाला पण त्याने हार मानली नाही. पुन्हा जिद्दीने अभ्यास सुरू केला आणि IAS झाला आहे. त्याच्यापासून अनेकांना आता प्रेरणा मिळत आहे.

कष्टाचं फळ! ग्रॅज्युएशनमध्ये नापास पण हार नाही मानली; मेहनतीने झाला IAS ऑफिसर
UPSC परीक्षा ही केवळ देशातीलच नव्हे तर जगभरातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. पण अनेक जण प्रचंड मेहनत करून घवघवीत यश संपादन करतात. अशीच एक प्रेरणादायी घटना समोर आली आहे. ग्रॅज्युएशनमध्ये नापास झाला पण त्याने हार मानली नाही. पुन्हा जिद्दीने अभ्यास सुरू केला आणि IAS झाला आहे. त्याच्यापासून अनेकांना आता प्रेरणा मिळत आहे.
कटिहार येथील रहिवासी असलेल्या अनुराग कुमार यांनी घवघवीत यश संपादन केलं आहे. अनुराग यांनी आठवीपर्यंत हिंदी माध्यमात शिक्षण घेतलं होतं. यानंतर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश घेण्यात आला. त्यामुळे इंग्रजी भाषेचा अभ्यास करताना त्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागला. ते अभ्यासात फारसे हुशार नव्हते पण खूप मेहनती होते. या मेहनतीच्या जोरावर त्यांनी दहावीत ९० टक्के गुण मिळवले होते.
बारावीतही चांगले गुण मिळाले होते. त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. पण अनुराग पदवीच्या पहिल्या वर्षात अनेक विषयात नापास झाले. यानंतर त्यांनी पुन्हा पेपर दिला आणि सर्व विषय उत्तीर्ण झाले. पदवीनंतर त्यांनी पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला. पदव्युत्तर शिक्षण घेत असतानाच त्यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली.
2017 मध्ये अनुरागने 677 रँक मिळवला होता. पण ते आयएएस होऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी पुन्हा तयारी सुरू केली आणि 2018 मध्ये 48 वा क्रमांक मिळवून आयएएस पद मिळवून आपलं स्वप्न पूर्ण केलं. निरुपयोगी गोष्टींमध्ये वेळ वाया घालवण्याऐवजी ते सेल्फ स्टडीमध्ये वेळ घालवत असत. त्यांनी परीक्षेची जोरदार तयारी केली आणि यश मिळवलं.