फेसबुकवर मैत्री अन् प्रेमात फसवलं; भारताच्या गगनयान प्रोजेक्टची सीक्रेट माहिती लीक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 15:28 IST2025-03-14T15:28:01+5:302025-03-14T15:28:19+5:30
या प्रकरणाची गंभीर दखल घेत उत्तर प्रदेश एटीएसने सखोल चौकशीला सुरूवात केली आहे.

फेसबुकवर मैत्री अन् प्रेमात फसवलं; भारताच्या गगनयान प्रोजेक्टची सीक्रेट माहिती लीक
आग्रा - उत्तर प्रदेशातील दहशतवाद विरोधी पथकाने आग्रा येथील ऑर्डिनेंस फॅक्टरीतून फिरोजाबादच्या रविंद्र कुमार आणि त्यांच्या एका सहकाऱ्याला अटक केली आहे. पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI ला गुप्त लष्करी माहिती आणि वैज्ञानिक माहिती पाठवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. रविंद्र कुमारला हनीट्रॅपमध्ये अडकवलं, ISI च्या महिला एजेंटने सोशल मीडियावर रविंद्रसोबत मैत्री केली, त्यानंतर त्याच्याकडून संवेदनशील माहिती जमा करू लागली. या जाळ्यात रविंद्र कुमार अडकत गेला. आता यूपी एटीएस रविंद्रकडून देशातील आयएसआयच्या नेटवर्कचा शोध घेत आहे.
एटीएसच्या तपासात समोर आलंय की, रविंद्र कुमारला आयएसआय महिला एजेंटने नेहा शर्मा नावाने बनावट अकाऊंट बनवून जाळ्यात ओढलं. तपासात महिलेने स्वत:ला पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेची एजेंट असल्याचं सांगितले. त्यानंतर पैशाचं आमिष दाखवून रविंद्रकडून सीक्रेट माहिती काढून घेतली. रविंद्रनेही आयएसआयला एजेंटला ऑर्डिनेंस फॅक्टरीतील निगडित अनेक गोपनीय कागदपत्रे पाकिस्तानला पाठवली. त्यात ऑर्डिनेंस फॅक्टरीचा डेली प्रोडक्शन रिपोर्ट समावेश आहे. त्याशिवाय स्क्रिनिंग कमिटीची काही डॉक्युमेंट्स आहेत. इतकेच नाही तर ड्रोन, गगनयान प्रोजेक्टबाबतही काही महत्त्वाची माहिती लीक करण्यात आली आहे.
मोबाईलमधून मिळाले महत्त्वाचे कागदपत्रे
यूपी एटीएसने रविंदचा मोबाईल तपासला असता त्यात सैन्य आणि ऑर्डिनेंस फॅक्टरीतील काही गोपनीय कागदपत्रे सापडली. त्यात ५१ गुरखा रायफल्सच्या अधिकाऱ्यांचे आणि लॉजिस्टीक ड्रोनच्या चाचणीची काही माहिती आहे. व्हॉट्सअपच्या माध्यामतून ही संवेदनशील कागदपत्रे शत्रू देश पाकिस्तानला पाठवली होती.
सोशल मीडियातून जाळ्यात अडकला
नेहा शर्मा नावाने पाकिस्तानी महिला एजेंटने रविंद्र कुमारशी फेसबुकवर मैत्री वाढवली. दोघांमध्ये नंबर एक्सचेंज झाले. त्यानंतर व्हॉट्सअपवर चॅट, ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलही झाले. हळूहळू महिला एजेंटने रविंद्र कुमारला त्याच्या प्रेमात अडकवले, त्यानंतर भारताशी निगडित गोपनीय माहिती महिला रविंद्र कुमारकडून मिळवू लागली.
दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत उत्तर प्रदेश एटीएसने सखोल चौकशीला सुरूवात केली आहे. रविंद्र आणि त्यांच्या संपर्कात असणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे. तपासावेळी बरेच महत्त्वाचे खुलासे समोर आलेत. त्यामुळे देशातील पाकिस्तानी आयएसआयचा नेटवर्कचा पर्दाफाश होण्यास मदत मिळू शकते.