UP:उत्तर प्रदेशातील सीतापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. माकडाने एका दोन महिन्यांच्या चिमुकल्याला पाण्याच्या ड्रममध्ये बुडवून ठार मारले. हे बाळ घराबाहेर ठेवलेल्या एका खाटेवर झोपले होते. अचानक माकड घरात घुसले अन् बाळाला घेऊन गेले. कुटुंबातील सदस्यांना शोध सुरू केला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. विशेष म्हणजे, कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती न देता मृतदेह पुरला.
माकडाने बाळाला खाटेवरुन उचलून नेलेमिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मच्छरेहटा पोलिस स्टेशन परिसरातील सूरजपूर गावची आहे. गुरुवारी अनुज कुमार यांचे दोन महिन्यांचे बाळ अचानक बेपत्ता झाले. बराच शोध घेतल्यानंतर घराच्या छतावर ठेवलेल्या पाण्याने ड्रममधून त्याचा मृतदेह सापडला. माकडांनी मुलाला खाटेवरुन नेऊन ड्रममध्ये टाकल्याचे सांगण्यात आले. घटनेच्या वेळी अनुज कुमार यांची पत्नी सविता बाथरूममध्ये आंघोळ करत होती. मुलाला व्हरांड्यातील खाटेवर ठेवले होते.
अनुज आणि सविता यांचे हे पहिलेच बाळ होते. बाळाच्या अचानक मृत्यूमुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे, बाळाच्या मृत्यूनंतर गुरुवारी संध्याकाळी उशिरा कुटुंबाने पोलिसांना माहिती न देता त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. पण, शुक्रवारी सकाळी गावात घटनेची माहिती पसरताच प्रकरण उघडकीस आले. प्रभारी निरीक्षक प्रभात कुमार म्हणाले की, आतापर्यंत कुटुंबाकडून कोणतीही तक्रार आलेली नाही. मात्र, पोलिसांनी जबाब नोंदवून तपास सुरू केला आहे.