लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशातील एका न्यायालयाने समन्स बजावले आहे. त्यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान भारतीय सैन्याविरुद्ध केलेल्या कथित अपमानास्पद विधानासंदर्भात लखनौ न्यायालयाने हे समन्स बजावले आहे.
राहुल गांधी यांना ही नोटीस लखनौच्या एमपी एमएलए न्यायालयाने बजावली आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात त्यांना न्यायालयात हजर राहावे लागेल. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे (BRO) माजी संचालक उदय शंकर श्रीवास्तव यांनी त्यांच्याविरुद्ध हा खटला दाखल केला आहे. १६ डिसेंबर २०२२ रोजी भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींनी भारतीय सैन्यासंदर्भात भाष्य केल्याचा आरोप आहे.
असं आहे संपूर्ण प्रकरण -तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, पत्रकारांसोबत बोलताना राहुल गांधी म्हणाले होते, "9 डिसेंबर 2022 रोजी अरुणाचल प्रदेशात चिनी सैनिकांकडून भारतीय सैनिकांना मारहाण झाली, त्यासंदर्भात कुणीही काहीही विचारत नही?" यानंतर, 12 डिसेंबर 2022 रोजी भारतीय सेनिकांनी राहुल गांधी यांच्या या विधानाचे खंडन केले होते. सेन्याने अधिकृत निवेदन दिले होते की, "अरुणाचल प्रदेशात चिनी सेनिकांनी अवैधरित्या घुसखोरी केली होती. त्याला भारतीय जवानांनी प्रत्युत्तर दिले आणि चिनी सैनिक परत निघून गेले."
उदय शंकर श्रीवास्तव यांच्या मते, राहुल गांधी यांनी भारतीय सैनिकांची खिल्ली उडवत बदनामी केली. न्यायालयाने प्रकरणाच्या सुनावणीनंतर, 24 मार्चसाठी राहुल गांधी यांना समन्स बजावले आहे.
राहुल गांधीच्या विधानाने निर्माण झाला होता वाद - त्यावेळी अनेक भाजप नेत्यांनी राहुल गांधी यांना त्यांच्या या विधानासाठी देशद्रोही म्हटले होते, तर विरोधकांनी याला राहुल गांधींविरोधातील षड्यंत्र, म्हटले होते. महत्वाचे म्हणजे चीनच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते सातत्याने सरकारवर हल्ला करताना दिसतात.