कडक सॅल्यूट! पतीचं आजारपण, 60 व्या वर्षी 'ती' चालवतेय ई-रिक्षा; कुटुंबासाठी धडपड
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2023 10:40 IST2023-09-11T10:39:43+5:302023-09-11T10:40:07+5:30
वयाच्या 60 व्या वर्षी एका महिलेला ई-रिक्षा चालक व्हावे लागले आहे. महिलेने यावरच तीन मुलांची लग्नं करून त्यांना संसार थाटण्यासाठी मदत केली, पण आता ती पतीच्या आजारपणाचा खर्चही उचलत आहे. पतीसाठी कष्ट करत आहे.

कडक सॅल्यूट! पतीचं आजारपण, 60 व्या वर्षी 'ती' चालवतेय ई-रिक्षा; कुटुंबासाठी धडपड
आयुष्य जगताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पण काही लोक परिस्थितीसमोर हार मानत नाहीत. खचून न जाता जोमाने पुढे जातात अशीच एक घटना आता समोर आली आहे. वयाच्या 60 व्या वर्षी एका महिलेला ई-रिक्षा चालक व्हावे लागले आहे. महिलेने यावरच तीन मुलांची लग्नं करून त्यांना संसार थाटण्यासाठी मदत केली, पण आता ती पतीच्या आजारपणाचा खर्चही उचलत आहे. पतीसाठी कष्ट करत आहे.
उत्तर प्रदेशातील बागपत येथील बालेश यांची संघर्षकथा ऐकल्यानंतर तुम्हीही सलाम कराल. 60 वर्षांच्या बालेश यांनी कुटुंबासाठी मोठा निर्णय घेतला. पती बेरोजगार होते. कामाच्या शोधात असताना ते आजाराला बळी पडले. उत्पन्नाचं दुसरे कोणतेही साधन नसल्याने बालेश यांनी स्वतः घराबाहेर पडून जबाबदारी पार पाडण्याचा मोठा निर्णय घेतला.
बालेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी ई-रिक्षा चालवण्याचा विचार केला. वाहन खरेदीची चर्चा सुरू झाली, तेव्हा तुम्ही ई-रिक्षा चालवणार का असा लोकांनी प्रश्न विचारला. मी उत्तर दिलं की मुलं माझी आहेत, नवरा माझा आहे, आता मला त्यांची जबाबदारी घ्यावी लागेल. आज महिला राष्ट्रपती होऊ शकतात तर मी ई-रिक्षा चालवू शकत नाही का?
बालेश यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी ई-रिक्षा विकत घेतली आणि चालवायला सुरुवात केली. सुरुवातीला कमी रायडर्स होते, पण आता लोकांनी सहकार्य करायला सुरुवात केली आहे. रस्त्यावरही मला माझ्या मित्रांकडून खूप पाठिंबा मिळतो. वाहतूक आणि पोलीस कर्मचाऱ्यांची वागणूकही चांगली आहे. तिन्ही मुले विवाहित आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.