UP Assembly Election 2022: निवडणूक आयोगाचे अधिकारी करताहेत ईव्हीएमशी छेडछाड, मतमोजणीपूर्वी अखिलेश यादवांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 22:38 IST2022-03-08T22:38:29+5:302022-03-08T22:38:59+5:30
UP Assembly Election 2022: एक्झिट पोल प्रसिद्ध झाल्यानंतर समाजवादी पक्षाची प्रतिक्रिया समोर आली आहे. भाजपाचा विजय होईल, असे जनमानस तयार करण्यासाठी एक्झिट पोल तयार करण्यात आले आहेत. तसेच निवडणूक अधिकाऱ्यांकडून ईव्हीएमशी छेडछाड करण्यात येत असल्याचा आरोपही अखिलेश यादव यांनी केला.

UP Assembly Election 2022: निवडणूक आयोगाचे अधिकारी करताहेत ईव्हीएमशी छेडछाड, मतमोजणीपूर्वी अखिलेश यादवांचा गंभीर आरोप
लखनौ - चुरशीच्या झालेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान काल आटोपले. त्यानंतर आलेल्या एक्झिट पोलमधून उत्तर प्रदेशात भाजपाचं सरकार येईल, असा कल वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, एक्झिट पोल प्रसिद्ध झाल्यानंतर समाजवादी पक्षाची प्रतिक्रिया समोर आली आहे. भाजपाचा विजय होईल, असे जनमानस तयार करण्यासाठी एक्झिट पोल तयार करण्यात आले आहेत. तसेच निवडणूक अधिकाऱ्यांकडून ईव्हीएमशी छेडछाड करण्यात येत असल्याचा आरोपही अखिलेश यादव यांनी केला.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार अखिलेश यादव यांनी सांगितले की, भाजपा जिंकेल असा मतप्रवाह एक्झिट पोल निर्माण करत आहेत. ही लोकशाहीची शेवटची लढाई आहे. उमेदवारांना न सांगता ईव्हीएम पोहोचवल्या जात आहेत. जर ईव्हीएम अशा प्रकारे नेण्यात येत असतील तर आपल्याल सतर्क राहिले पाहिजे. ही चोरी आहे. आपली मते वाचवण्याची गरज आहे. आम्ही याविरोधात न्यायालयात जाऊ शकतो. मात्र त्यापूर्वी मी लोकांना लोकशाही वाचवण्याचे आवाहन करतो.
अखिलेश यादव यांनी पुढे सांगितले की, समाजवादी पक्ष अयोध्येत विजय मिळवणार आहे, त्यामुळेच भाजपा घाबरली आहे. आता निवडणूक आयोगाचे अधिकारी ईव्हीएमशी छेडछाड करत आहेत. सोनभद्रमध्ये सपाच्या नेत्यांनी स्ट्रॉंग रूम परिसरामध्ये जात असलेल्या सरकारी गाड्या पकडल्या आहेत. त्यामध्ये शिक्का आणि मतपेट्या मिळाल्या आहेत.
अखिलेश यादव यांनी कार्यकर्त्यांना संदेश दिला आहे की, जर तुम्ही मत दिले असेल तर ते मत वाचवा. आता आणखी तीन दिवस ईव्हीएम वाचवाव्या लागतील. जसे शेतकरी बसले तसेच कार्यकर्त्यांनाही बसावे लागेल. लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांना पुढे यावे लागेल, असेही त्यांनी सांगितले.