UP Assembly Election 2022: उत्तर प्रदेशात भाजपाला मोठा धक्का, युती न झाल्याने जेडीयूने साथ सोडली, केली स्वतंत्र लढण्याची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2022 16:24 IST2022-01-22T16:22:41+5:302022-01-22T16:24:13+5:30
UP Assembly Election 2022: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधारी BJPच्या अडचणी चांगल्याच वाढत चालल्या आहेत. त्यातच आता भाजपासोबत आघाडी न झाल्याने भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या JDUने स्वतंत्रपणे आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे.

UP Assembly Election 2022: उत्तर प्रदेशात भाजपाला मोठा धक्का, युती न झाल्याने जेडीयूने साथ सोडली, केली स्वतंत्र लढण्याची घोषणा
लखनौ - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधारी भाजपाच्या अडचणी चांगल्याच वाढत चालल्या आहेत. त्यातच आता भाजपासोबत आघाडी न झाल्याने भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या जेडीयूने स्वतंत्रपणे आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. आज जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार राजीव रंजन उर्फ ललन सिंह यांनी पत्रकार परिषद घेत जेडीयूच्या उत्तर प्रदेशमधील उमेदवारांची घोषणा केली आहे. यावेळी उत्तर प्रदेश जेडीयूच्या प्रमुखांनी 26 उमेदवारांची यादी जाहीर केली.
ललन सिंह यांनी सांगितले की , केंद्रीय मंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते आरसीपी सिंह यांनी भाजपा उत्तर प्रदेशमध्ये जेडीयूसोबत मिळून निवडणूक लढवू इच्छिते. याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि भाजपाच्या इतर नेत्यांसोबत चर्चा झाली होती. मात्र भाजपाकडून काही सकारात्मक उत्तर आलं नाही. भाजपाध्यक्ष जे.पी नड्डा यांनीही उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक अपना दल आणि संजय निषाद यांच्या पक्षांसोबत मिळून लढण्याची घोषणा केली होती. यामध्ये जेडीयूचे नाव नव्हते.
जर हे आधीच निश्चित झाले असते तर आम्ही उत्तर प्रदेशात 100 जागांवर निवडणूक लढलो असतो. आता आम्हाला 50 ते 60 जागांवरच निवडणूक लढवता येईल. मात्र आमचा पक्ष पूर्ण ताकतीनिशी निवडणूक लढवणार असून, चांगल्या संख्येने उमेदवार जिंकून आणेल. मात्र उत्तर प्रदेशात स्वतंत्र लढण्याचा बिहारमधील भाजपा जेडीयू युतीवर काही परिणाम होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या 403 जागांसाठी सात टप्प्यात मतदान होणार आहे. 10 मार्च रोजी या निवडणुकीचा निकाल हाती येईल.