अरे देवा! पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात वेडा झाला 'बाबू'; व्हिसा, पासपोर्टशिवाय पोहोचला सीमापार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 10:59 IST2025-01-01T10:58:57+5:302025-01-01T10:59:55+5:30
उत्तर प्रदेशातील अलीगढ येथील बाबूने आपल्या प्रेमासाठी देशाची सीमा ओलांडली आहे.

फोटो - ABP News
प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. अशीच एक धक्कदायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील अलीगढ येथील बाबूने आपल्या प्रेमासाठी देशाची सीमा ओलांडली आहे. अलीगढचा बाबू सोशल मीडियावर पाकिस्तानी तरुणीच्या प्रेमात पडला आणि तिच्या प्रेमासाठीच त्याने व्हिसा आणि पासपोर्टशिवाय सीमा ओलांडली, त्यानंतर बाबूला पाकिस्तानी पोलिसांनी ताब्यात घेतलं.
हे संपूर्ण प्रकरण अलीगढ जिल्ह्यातील आहे. बादल उर्फ बाबूची प्रेमकहाणी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. काही लोक त्याचं कौतुक करत आहेत, काही टीका करत आहेत. तर काही जण बाबूला पाकिस्तानातून सुखरूप परत आणण्याची मागणी भारत सरकारकडे करत आहेत.
अलीगढ जिल्ह्यातील बरला पोलीस स्टेशन हद्दीतील नगला खिटकारी गावात राहणारा ३० वर्षीय बादल उर्फ बाबू सोशल मीडियावर एका पाकिस्तानी महिलेच्या प्रेमात पडला होता. बाबू या प्रेमात इतका वेडा झाला की त्याने आपलं घर सोडून पाकिस्तानला जाण्याचा निर्णय घेतला. त्याच्यावर व्हिसा किंवा कागदपत्रांशिवाय सीमा ओलांडल्याचा आरोप आहे. बाबूला सीमा ओलांडून पाकिस्तानातील मोजा मोंग परिसरात संशयास्पद हालचाली केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
ही घटना २७ डिसेंबर रोजी घडली असल्याची माहिती मिळत आहे. सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, पाकिस्तान पोलिसांच्या चौकशीदरम्यान बाबूने सांगितलं की, तो सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानी महिलेशी जोडला गेला होता आणि तिला भेटण्यासाठी तो पाकिस्तानात आला होता.
बाबूच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, ३० नोव्हेंबर रोजी ते त्यांच्या मुलाशी व्हिडीओ कॉलद्वारे बोलले होते, ज्यामध्ये मुलाने सांगितलं की त्यांचं काम पूर्ण झालं आहे. मात्र यानंतर मुलाशी संपर्क झाला नाही. पाकिस्तान पोलिसांच्या म्हणण्यानुसार, बाबूकडे व्हिसा किंवा इतर कागदपत्रं मागितली गेली तेव्हा त्याने काहीही दाखवले नाही. या कारणास्तव त्याला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे कुटुंबीयांची चिंता वाढली आहे.