तृणमुल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांना दिल्ली हायकोर्टाने आज मोठा धक्का दिला आहे. माजी राजनैतिक अधिकारी लक्ष्मी पुरी यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या एका खटल्याचा सुनावणीदरम्यान हायकोर्टाने खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.
या सुनावणीदरम्यान, न्यायमूर्ती मनमीत प्रितम सिंह अरोडा यांनी सांगितले की, संयुक्त राष्ट्रांमधील माजी सहाय्यक सरचिटणीस लक्ष्मी पुरी यांची माफी मागण्याचे आणि त्यांना ५० लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश साकेत गोखले यांना याआधी देण्यात आले होते. मात्र साकेत गोखले यांनी दंडाची रक्कमही भरली नाही आणि कुठलंही स्पष्टीकरणही दिलं नाही.
या प्रकरणी कोर्टाने आता साकेत गोखले यांचं वेतन जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशात कोर्टाने म्हटले की, जोपर्यंत ५० लाख रुपये जप्त होत नाहीत, तोपर्यंत नागरी प्रक्रिया संहिता कलम ६०(१) अन्वये साकेत गोखले यांचं नमूक केल्याप्रमाणे १.९० लाख रुपये असलेलं वेतन जप्त करण्याचे आदेश देण्यात यावेत.