RSS: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSSS) प्रमुख मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा हिंदू समाजाच्या एकतेवर भर दिला आहे आणि म्हटले आहे की भारताची एकता ही हिंदूंच्या सुरक्षिततेची हमी आहे. हिंदू समाज आणि भारत एकमेकांशी खोलवर जोडलेले आहे. जेव्हा हिंदू समाज मजबूत होईल, तेव्हाच भारतालाही वैभव मिळेल.
आरएसएसचे मुखपत्र 'ऑर्गनायझर वीकली' ला दिलेल्या विशेष मुलाखतीत भागवत यांनी शेजारील देशांमध्ये सुरू असलेल्या हिंदूंवरील अत्याचार आणि मानवाधिकार संघटनांच्या मौनावर प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, जोपर्यंत हिंदू समाज स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत जगात कोणीही त्यांची काळजी करणार नाही. संघ जगभरातील हिंदूंसाठी शक्य ते सर्व करेल. संघाचे स्वयंसेवक धर्म, संस्कृती आणि समाजाचे रक्षण करताना हिंदू राष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याची शपथ घेतात.
हिंदू समाज आणि भारत एकमेकांशी खोलवर जोडलेले आहेत, त्यामुळे हिंदू समाजाचे प्रतिष्ठेमुळे भारतालाही गौरव मिळेल. जे लोक आज स्वतःला हिंदू मानत नाहीत, एकेकाळी ते देखील हिंदू होते. त्यांना सोबत घेऊन जाण्याचे उदाहरण केवळ एक मजबूत हिंदू समाजच ठेवू शकतो. जर भारतातील हिंदू समाज मजबूत झाला, तर स्वाभाविकपणे जगभरातील हिंदूंनाही बळ मिळेल. हे काम चालू आहे, पण अद्याप पूर्ण झालेले नाही. हळूहळू पण निश्चितच ही परिस्थिती विकसित होत आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
भागवत पुढे म्हणतात, बांग्लादेशातील हिंदूंवरील अत्याचारांविरुद्ध यावेळी जो संताप व्यक्त झाला आहे, तो यापूर्वी कधीही पाहिला गेला नव्हता. आता तिथले हिंदू म्हणत आहेत - 'आम्ही पळून जाणार नाही, आम्ही आमच्या हक्कांसाठी लढू.' हिंदू समाजाची अंतर्गत ताकद वाढत आहे आणि संघटनेच्या विस्तारामुळे ही ताकद आणखी व्यापक होईल. हे ध्येय पूर्णपणे साध्य होईपर्यंत आपल्याला लढा सुरू ठेवावा लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.