उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 05:36 IST2025-05-03T05:35:58+5:302025-05-03T05:36:53+5:30
दिल्लीत वर्दळीच्या रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूककोंडी

उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीसह उत्तरेकडील अनेक राज्यांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. अंगावर वीज, झाड तसेच घर कोसळून दिल्ली व उत्तर प्रदेशात प्रत्येकी ४ तर छत्तीसगडमध्ये दोघांचा मृत्यू झाला. खराब हवामानामुळे इंदिरा गांधी विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या २०० हून अधिक विमानांना उशीर झाला तर दोन फ्लाइट जयपूर तर एक अहमदाबादमध्ये उतरवण्यात आली. पंजाब, हरयाणा, राजस्थान, पश्चिम बंगाल व जम्मू-काश्मीरमध्येदेखील अवकाळी पावसाचा फटका बसला.
दिल्लीतील नजफगड क्षेत्रातील खडखडी नहर गावात पहाटे मुसळधार पावसामुळे घर कोसळून तीन मुलांचा व एका महिलेचा मृत्यू झाला.
शुक्रवारी सकाळी ढगांच्या गडगडाटासह तुफान पाऊस झाला. दिल्लीतील मिंटो पूल व आयटीओसह अनेक वर्दळीच्या रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूककोंडी झाली होती. दिल्लीत तीन तासांत ७७ मिमी पावसाची नोंद झाली.
राजस्थानात बहुतांश भागात शुक्रवारी मध्यम व तुफान पाऊस झाला. मात्र, याच राज्यातील जोधपूर व उदयपूर मंडळात उष्णतेची लाट पसरली होती. भरतपूर येथे सर्वाधिक ७७ मिमी पावसाची नोंद झाली.
महाराष्ट्रात आठवडाभर वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाचे वातावरण राहणार
मुंबई : राज्यातील बहुतांशी शहरांच्या कमाल तापमानात वाढ झाल्यामुळे चटके बसत असतानाच आता पुढील सात दिवस राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तविली आहे.
संपूर्ण कोकण, खान्देश, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, बीड, नांदेड, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, अमरावती या जिल्ह्यांत ३ ते १० मेपर्यंतच्या आठवड्यात ढगाळ वातावरण राहील.
किरकोळ ठिकाणी एखाद-दुसऱ्या दिवशी विजांचा गडगडाट, वाऱ्यासह किरकोळ पावसाची शक्यता आहे. या वातावरणाचा प्रभाव विदर्भातील जिल्ह्यांत जाणवू शकतो. किरकोळ गारपिटीचीही शक्यता आहे. मुंबईत सकाळी आकाश ढगाळ असेल, तर दुपारी निरभ्र राहील.
महाराष्ट्रात कमाल तापमान ३८ अं.से. तर काही ठिकाणी ४० अं.से. आहे. शनिवारपासूनच्या आठवड्यात तापमान दोन अंश सेल्सिअसने खालावण्याची शक्यता आहे. सध्या महाराष्ट्रात रात्रीचा उकाडा वा कुठेही उष्णतेच्या लाटेची शक्यता नाही.
माणिकराव खुळे, हवामानतज्ज्ञ