अविवाहित मुलगी पालकांकडे लग्नाचा खर्च मागू शकते - हायकोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 07:00 IST2022-04-01T06:59:37+5:302022-04-01T07:00:20+5:30
छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निर्णय

अविवाहित मुलगी पालकांकडे लग्नाचा खर्च मागू शकते - हायकोर्ट
रायपूर : अविवाहित मुलगी हिंदू दत्तक व पालन पाेषण कायद्यानुसार आपल्या आई-वडिलांना लग्नाचा खर्च मागू शकते, असा निर्णय छत्तीसगड उच्च न्यायालयाने दिला आहे. हा खर्च पालनपाेषणाच्या कक्षेत येत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
दुर्ग काैटुंबिक न्यायालयाच्या निर्णयाविराेधात राजेश्वरी या ३५ वर्षीय महिलेने उच्च न्यायालयात धाव घेतली हाेती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. राजेश्वरीचे वडील भानू राम हे भिलाई पाेलाद कारखान्यात काम करतात. ते लवकरच सेवानिवृत्त हाेणार आहेत. राजेश्वरीने लग्नाचा खर्च म्हणून २० लाख रुपये देण्याची मागणी केली हाेती. त्यासाठी तिने काैटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली हाेती. मात्र, मुलगी स्वत:च्या लग्नाचा खर्च वडिलांना मागू शकते, अशी काेणतीही तरतूद नसल्याचे सांगून काैटुंबिक न्यायालयाने तिची याचिका २०१६ मध्ये फेटाळली हाेती. त्याविराेधात तिने उच्च न्यायालयात धाव घेतली हाेती. याचिकेत तिने म्हटले हाेते, की भानू राम यांना सेवानिवृत्तीच्या वेळी ५५ लाख रुपये मिळू शकतात. त्याचा एक भाग २० लाख रुपये वैवाहिक खर्च म्हणून अविवाहित मुलीला देण्यात यावा, अशी मागणी तिने केली हाेती. मुलगी वडिलांना लग्नाच्या खर्चाची मागणी करू शकते. हा खर्च पालन-पाेषणाच्या कक्षेत येताे, असा दावा तिने केला हाेता. हा युक्तिवाद न्यायालयाने मान्य केला.