अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 16:33 IST2025-05-01T16:32:38+5:302025-05-01T16:33:23+5:30
लग्नाआधी अचानक वधूची तब्येत बिघडली. पण कुटुंबाने शुभ मुहूर्त वाया जाऊ दिला नाही.

फोटो - आजतक
मध्य प्रदेशच्या राजगड जिल्ह्यातील ब्यावरा शहरात अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने एक अनोखा विवाहसोहळा पाहायला मिळाला. लग्नाआधी अचानक वधूची तब्येत बिघडली. पण कुटुंबाने शुभ मुहूर्त वाया जाऊ दिला नाही. त्यांनी थेट रुग्णालयाचं रूपांतरच लग्नमंडपात केलं. या लग्नाने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं.
ब्यावरा येथील परमसिटी कॉलनीतील रहिवासी जगदीश सिंह सिकरवार यांचा भाचा आदित्य सिंहचं लग्न कुंभराज येथील रहिवासी नंदिनीशी ठरलं होतं. हे लग्न अक्षय्य तृतीयेच्या दिवशी कुंभराजजवळील पुरुषोत्तमपुरा गावात होणार होतं. पण लग्नाच्या पाच दिवस आधी नंदिनीची तब्येत अचानक बिघडली. तिला बेवार येथील पंजाबी नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आलं, जिथे डॉक्टरांनी तिला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला.
नवरीची तब्येत आणि लग्नाचा शुभ मुहूर्त अशा दोन्ही गोष्टीची कुटुंबीयांना काळजी वाटत होती. डॉ. जे.के. पंजाबी म्हणाले की, नंदिनी जास्त वेळ बसू शकत नव्हती, म्हणून कुटुंबाने त्यांचा सल्ला घेतला आणि रुग्णालयातच लग्न करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला दोन्ही कुटुंबांची संमती होती. लग्नाच्या दिवशी नवरदेव आदित्य सिंह बँड-बाजा घेऊन थेट पंजाबी नर्सिंग होममध्ये पोहोचला.
लग्नाचा मंडप रुग्णालयातच सजवण्यात आला होता, विधी पूर्ण झाले. नवरदेवाने नवरीला उचलून घेत सप्तपदी घेतल्या. या दृश्याने तिथे उपस्थित असलेल्या सर्वांचेच डोळे पाणावले. परिस्थिती कशीही असली तरी त्यातून मार्ग काढा असा संदेश या लग्नाने सर्वांना दिला आहे. या अनोख्या लग्नाची सर्वत्र आता जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे.