मला मंत्री व्हायचेच नव्हते! केंद्रीय मंत्रीपदापेक्षा अभिनय महत्त्वाचा; कमाई थांबली म्हणत सुरेश गोपींना व्यक्त केली राजीनाम्याची इच्छा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 13:05 IST2025-10-13T12:58:12+5:302025-10-13T13:05:36+5:30
केंद्रीय राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त करत मंत्रिपदासाठी एक नावही सुचवले आहे.

मला मंत्री व्हायचेच नव्हते! केंद्रीय मंत्रीपदापेक्षा अभिनय महत्त्वाचा; कमाई थांबली म्हणत सुरेश गोपींना व्यक्त केली राजीनाम्याची इच्छा
Union Minister Suresh Gopi: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी राजीनामा देण्याची तीव्र इच्छा व्यक्त केल्याचे समोर आली आहे. मंत्री झाल्यानंतर आपल्याला अभिनय क्षेत्रात पूर्णवेळ परत जायचे असून, कुटुंबाचे उत्पन्न थांबल्यामुळे हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांच्या जागी नवनिर्वाचित भाजप राज्यसभा सदस्य सी सदानंदन मास्टर यांचा समावेश करण्याची शिफारस केली. केंद्रीय पेट्रोलियम आणि पर्यटन राज्यमंत्री गोपी यांनी सदानंदन यांचे खासदार कार्यालय लवकरच मंत्री कार्यालयात बदलले जावे अशी इच्छा व्यक्त केली.
सुरेश गोपी हे केरळमधील त्रिशूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले भाजपचे पहिले खासदार आहेत. सध्या ते केंद्रीय पेट्रोलियम आणि पर्यटन राज्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत. कन्नूर येथे भाजपच्या एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी हे खळबळजनक विधान केले. सदानंद यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना सुरेश गोपी म्हणाले की, सदानंद यांचे राज्यसभा सदस्य होणे हे उत्तर कन्नूर जिल्ह्याच्या राजकारणात एक महत्त्वपूर्ण बदल आहे.
दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील एक मोठे स्टार असलेल्या सुरेश गोपी यांनी सांगितले की, मंत्री झाल्यापासून त्यांचे आर्थिक उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटले आहे. "मी ऑक्टोबर २००८ मध्ये पक्षात सामील झालो. मी जनतेने निवडून दिलेला पहिला खासदार होतो आणि पक्षाला वाटले की मला मंत्री बनवले पाहिजे. मी कधीही मंत्री होण्यासाठी प्रार्थना केली नाही. निवडणुकीच्या आदल्या दिवशी मी पत्रकारांना सांगितले होते की मला मंत्री व्हायचे नाही, मला माझे सिनेमाचे करिअर सुरू ठेवायचे आहे. मला माझे फिल्मी करिअर सोडून कधीही मंत्री व्हायची इच्छा नव्हती. मला अभिनय सुरू ठेवायचा आहे आणि पैसे कमवायचे आहेत. माझ्यावर अवलंबून असलेल्या काही लोकांची मदत करण्यासाठी माझी कमाई थांबता कामा नये. पण आता माझी कमाई पूर्णपणे थांबली आहे," असे सुरेश गोपी यांनी सांगितले.
दरम्यान, राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त करताना त्यांनी राज्यसभा सदस्य सी. सदानंदन मास्टर यांना आपल्या जागी केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान द्यावे अशी शिफारस केली आहे. "मला वगळले आणि सदानंदन मास्टर यांना मंत्री बनवले, तर ते केरळच्या राजकीय इतिहासात एक नवीन अध्याय असेल," असे ते म्हणाले. सुरेश गोपी यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून, आता पक्षनेतृत्व या लोकप्रिय अभिनेत्याच्या प्रस्तावावर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.