केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 10:47 IST2025-12-22T10:46:48+5:302025-12-22T10:47:23+5:30
ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांचा ८१४ वा उर्स यंदा २२ डिसेंबरपासून सुरू होत आहे. ही यात्रा ३० डिसेंबरपर्यंत चालेल.

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
नवी दिल्ली - सूफी संत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या ८१४ व्या उर्सच्या निमित्ताने केंद्रीय अल्पसंख्याक आणि संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू अजमेर शरीफ दर्गाला जात आहेत. त्याठिकाणी प्रथेप्रमाणे ते दर्ग्यावर चादर चढवतील. उर्सच्या निमित्त दरवर्षी केंद्र सरकारकडून ही भेट दिली जाते. या दर्ग्याबाबत काही वादही सुरू आहेत आणि काही संघटनांनी अशाप्रकारे चादर चढवण्याची प्रथा बंद करावी अशी मागणी कोर्टाकडे केली आहे.
दर्ग्याला पोहचण्यापूर्वी किरेन रिजिजू यांनी सांगितले की, माझा हा दौरा पूर्णपणे धार्मिक आहे. मी तिथे लोकांच्या भल्यासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी दुआ करायला जात आहे. मी कुठलेही राजकारण करायला तिथे जात नाही. आम्ही दरवर्षी अजमेर शरीफला जातो. मागील वर्षीही गेलो होतो. आपला देश पुढे जावा, सर्व लोक आनंदात राहावी. देशात भाईचारा आणि शांतता कायम राहावी. आम्ही सर्व मिळून विकसित भारताच्या दिशेने पुढे जात राहो अशी प्रार्थना करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांचा ८१४ वा उर्स यंदा २२ डिसेंबरपासून सुरू होत आहे. ही यात्रा ३० डिसेंबरपर्यंत चालेल. उर्सचा मुख्य कार्यक्रम २२ ते ३० डिसेंबर कालावधीत असेल जिथे देश विदेशातील असंख्य श्रद्धाळू भाविक अजमेर शरीफला पोहचतील. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी केंद्र सरकारच्या अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाकडून दर्ग्यावर चादर चढवण्याची प्रथा कायम आहे. परंतु यावेळी उर्सवेळी एक वादही उभा राहिला आहे. हिदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णु गुप्ता यांनी कोर्टात याचिका करत अजमेर शरीफ दर्गा परिसरात शिव मंदिर असल्याचा दावा केला आहे. त्या प्रकरणी संविधानिक पदावर बसलेल्या लोकांकडून चादर चढवणे बंद करावे अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या याचिकेवरील सुनावणी कोर्टात ३ जानेवारीला निश्चित करण्यात आली आहे. सध्या कोर्टाने यावर कुठलेही निर्बंध आणले नाही. ज्यामुळे उर्सनिमित्त अजमेर शरीफ दर्ग्यावर चादर चढवण्याची परंपरा आजही कायम आहे. त्याचनिमित्ताने केंद्रीय अल्पसंख्याक कार्य मंत्री अजमेरला जाणार आहेत.