Local Body Election 2025: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. एकीकडे उमेदवार, मतदान, निधी यांवरून विविध नेत्यांची विधाने गाजत असताना भाजपा नेत्याने अख्ख्या गावाला खुली ऑफर दिली आहे. भाजपाचे समर्थन असलेल्या उमेदवाराला विजयी करा आणि लगेचच १० लाख रुपये मिळवा, असे भाजपा नेत्याने म्हटले आहे.
तेलंगणा राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ११ डिसेंबर, १४ डिसेंबर आणि १७ डिसेंबर अशा तीन टप्प्यात होणार आहेत. भाजपाचे केंद्रीय मंत्री बंदी संजय कुमार यांनी सोशल मिडियाच्या एक्सवर एक पोस्ट करून भाजपा समर्थित उमेदवाराला विजयी केल्यास १० लाख रुपये देईन, असे म्हटले आहे. बंदी संजय कुमार आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हणतात की, करीमनगर गावाने एकमताने भाजपा समर्थित उमेदवार निवडून द्यावा आणि विकासासाठी तत्काळ १० लाख रुपये मिळवावे. जर तुमच्या गावाने एकमताने करीमनगर मतदारसंघात भाजपा समर्थित सरपंच निवडून दिला तर मी कोणताही विलंब, कोणत्याही सबबीशिवाय त्या गावाच्या विकासासाठी थेट १० लाख रुपये निधी देईन, अशी खुली ऑफर केंद्रीय मंत्र्यांनी दिली आहे.
अधिक केंद्रीय निधी मिळवून देईन
केंद्रीय मंत्र्यांनी पुढे लिहिले आहे की, तुमचा खासदार म्हणून, मला MPLADS निधी उपलब्ध आहे. तुम्हाला आधीच माहिती आहे की, आम्ही CSR द्वारे कोट्यवधी रुपये कसे उभारले आहेत आणि ते शिक्षण, आरोग्यसेवा सुधारण्यासाठी गुंतवले आहेत. केंद्रीय मंत्री म्हणून मी पंचायत विकास आणखी चांगल्या पद्धतीने होण्यासाठी अधिक केंद्रीय निधी मिळवून देईन, असे आश्वासनही केंद्रीय मंत्री बंदी संजय कुमार यांनी दिले. मागील बीआरएस सरकारने एकमताने झालेल्या पंचायतींना ५ लाख रुपयांचे आश्वासन दिले होते. त्यावर विश्वास ठेवून, करीमनगर क्षेत्रातील जवळपास ७० गावांनी बीआरएस उमेदवारांना एकमताने निवडून दिले. पाच वर्षांनंतरही केसीआर सरकारने एकही रुपया दिला नाही, असा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, यापूर्वी, काँग्रेस सरकारनेही अशीच आश्वासने दिली होती. बिनविरोध निवडणुकांच्या नावाखाली लोकांना फसवले होते. काँग्रेस आणि बीआरएसवर विश्वास ठेवला त्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले. दोन्ही पक्ष आता तीच फसवणूक पुन्हा करण्याची तयारी करत आहेत. करीमनगरच्या लोकांनी त्यांच्या शब्दांना बळी पडू नये, असे आवाहन करतो. फक्त भाजपाच खरोखर निधी मिळवून देऊ शकतो. काँग्रेस किंवा बीआरएस समर्थित उमेदवार चुकून जिंकले तर नवीन निधी येणार नाही आणि केंद्रीय निधी वळवला जाऊ शकतो. त्यांच्या युक्त्यांना बळी पडू नका. त्यांच्या प्रलोभनांना बळी पडू नका. भाजपा समर्थित उमेदवारांना मतदान करा. चला एकत्र जिंकूया आणि आपल्या गावाला सर्व प्रकारे पुढे नेऊया, असे आवाहन बंदी संजय कुमार यांनी केले आहे.
Web Summary : Ahead of local elections in Telangana, a BJP leader offered ₹1 million to villages that unanimously elect a BJP-backed candidate. He promised additional central funding and criticized previous governments' unfulfilled promises.
Web Summary : तेलंगाना में स्थानीय चुनावों से पहले, एक भाजपा नेता ने भाजपा समर्थित उम्मीदवार को निर्विरोध चुनने वाले गांवों को ₹10 लाख की पेशकश की। उन्होंने अतिरिक्त केंद्रीय धन का वादा किया और पिछली सरकारों के अधूरे वादों की आलोचना की।