काय झालास तू? 'व्होट बँके'साठी महाभियोग प्रस्ताव आणल्याचा आरोप, ठाकरेंना अमित शाहांनी घेरले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 22:16 IST2025-12-10T22:14:17+5:302025-12-10T22:16:25+5:30
महाभियोग प्रस्तावावर सही केल्यावरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

काय झालास तू? 'व्होट बँके'साठी महाभियोग प्रस्ताव आणल्याचा आरोप, ठाकरेंना अमित शाहांनी घेरले
Amit Shah On Uddhav Thackeray: महाराष्ट्राच्या राजकारणातील भाजप आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत असताना, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा डिवचले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत केलेल्या एका भाषणाचा व्हिडिओ शेअर करत मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाकरेंच्या बदललेल्या राजकीय भूमिकेवर, खासकरून मतपेढीच्या राजकारणावरून "कोण होतास तू, काय झालास तू?" असा खोचक टोला लगावला आहे.
अमित शाह यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नुकतेच संसदेत निवडणुकीतील सुधारणांवर बोलताना विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर इंदिरा गांधी आणि सोनिया गांधी यांचा निवडणुकीतील विजय ही सर्वात मोठी व्होटचोरी असल्याचा गंभीर आरोप शाह यांनी केला.
यावेळी अमित शाह यांनी देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच घडलेल्या एका गंभीर घटनेकडे लक्ष वेधले. "स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच, केवळ मतपेढीच्या राजकारणासाठी (व्होट बँक) एका न्यायाधीशांविरुद्ध महाभियोग प्रस्ताव आणला जात आहे. सर्वात दुर्दैवी गोष्ट ही आहे की, उद्धव ठाकरे यांनीही या महाभियोग प्रस्तावावर स्वाक्षरी केली आहे. मतपेढीच्या राजकारणासाठी हे लोक एका न्यायाधीशाविरोधात महाभियोग प्रक्रिया राबवत आहेत," असं अमित शाह म्हणाले.
ज्या निर्णयावरून हा महाभियोग प्रस्ताव आला, तो निर्णय एका डोंगरावर सर्वात उंच दिवा पेटवण्याबाबत होता, असे शाह यांनी स्पष्ट केले. एका धार्मिक मुद्द्यावरून दिलेल्या निर्णयामुळे, अल्पसंख्याक मतांसाठी न्यायाधीशांवर महाभियोग आणला गेल्याचा आरोप अमित शाह यांनी केला.
मुख्यंमंत्री फडणवीसांचे एक ओळीचे मार्मिक ट्विट
अमित शाह यांच्या याच भाषणाची एक व्हिडिओ क्लिप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केली. या व्हिडिओद्वारे फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांचे मूळ हिंदुत्व सोडून अल्पसंख्याकांच्या मतांसाठी नवीन राजकीय भूमिका घेतल्याबद्दल टीका केली. "कोण होतास तू, काय झालास तू?" या शब्दात त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
कोण होतास तू, काय झालास तू?#UddhavThackeraypic.twitter.com/ZWsT4gu1CY
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 10, 2025
महाभियोग प्रस्तावाचे कारण काय?
न्यायमूर्ती स्वामीनाथन यांच्या विरोधात महाभियोग आणण्याचे मुख्य कारण त्यांच्या एका न्यायिक आदेशाशी संबंधित आहे. न्यायमूर्ती स्वामीनाथन यांनी मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुरै खंडपीठात सुब्रमण्यम स्वामी मंदिराच्या अधिकाऱ्यांना असा निर्देश दिला होता की, त्यांनी मंदिराच्या परंपरेनुसार एका दर्ग्याजवळ असलेल्या दीपदान स्तंभावर 'कार्तिगई दीपम' प्रज्वलित करावे. तामिळनाडू सरकारने या आदेशाला 'कायदा आणि सुव्यवस्था' बिघडवण्याचे कारण देत लागू करण्यास नकार दिला. सरकारच्या मते, या आदेशामुळे तामिळनाडूत जातीय संघर्ष निर्माण होण्याची शक्यता होती. सरकारने या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. इंडिया आघाडीचा आरोप आहे की, न्यायमूर्ती स्वामीनाथन यांचा हा निर्णय धर्मनिरपेक्ष संवैधानिक तत्त्वांच्या विरोधात आहे. तसेच, या निर्णयामुळे राज्यात भाजपकडून जातीय संघर्षाची स्थिती निर्माण केली गेली. मंगळवारी डीएमके नेत्या कनिमोझी, टी.आर. बालू, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांच्यासह विरोधी पक्षाच्या प्रतिनिधीमंडळाने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन हा महाभियोग प्रस्ताव सादर केला.