केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 06:41 IST2025-10-02T06:41:24+5:302025-10-02T06:41:40+5:30
शेतकरी, कर्मचारी, कर्जदार यांच्यासह सर्वसामान्यांना दिलासा देणारे काही निर्णय बुधवारी जाहीर करण्यात आले. यामुळे दसऱ्याच्या मुहूर्तावरच दिवाळीची भेट नागरिकांना मिळणार असून सणाचा आनंद द्विगुणीत हाेणार आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
नवी दिल्ली : दसऱ्याच्या पूर्वसंध्येला बुधवारी आपल्या कर्मचाऱ्यांना मोठी भेट देताना केंद्र सरकारने महागाई भत्त्यात (डीए) ३ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना याचा लाभ होईल. ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांचा ‘महागाई दिलासा’ही (डीआर) ३ टक्क्यांनी वाढविण्यात आला आहे.
सध्या डीए व डीआर हे मूळ वेतन व पेन्शनच्या ५५ टक्के आहेत. त्यात ३ टक्के वाढ होईल. ती पूर्वलक्षी प्रभावाने १ जुलै २०२५ पासून लागू होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. माहिती व प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, या निर्णयामुळे केंद्र सरकारच्या तिजोरीवर वार्षिक १०,०८३.९६ कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडेल.
केंद्र सरकार वर्षातून दोन वेळा डीए आणि डीआरमध्ये सुधारणा करते. या आधीची सुधारणा मार्चमध्ये झाली होती, तसेच तो बदल १ जानेवारीपासून लागू केला होता. केंद्रीय मंत्रिमंडळाने गेल्याच महिन्यात रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी कामगिरीवर आधारित बोनसला मंजुरी दिली होती.
प्रवासी : एसटीची हंगामी १० टक्के भाडेवाढ रद्द
मुंबई : राज्यातील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एसटीची दिवाळीतील १० टक्के भाडेवाढ रद्द करण्यात येत आहे. अशी घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार दरवाढ रद्द केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी हंगामात १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत साधी, निमआराम (हिरकणी), शयन आसनी, वातानुकूलित शिवशाही आणि जनशिवनेरी अशा सर्व बसगाड्यांमध्ये १० टक्के भाडेवाढ लागू होणार होती. परंतु, आता प्रवाशांना अतिरिक्त भाडे मोजावे लागणार नाही. त्यामुळे नेहमीच्या दरानुसार दिवाळीत देखील प्रवाशांना एसटीचे तिकीट काढणे शक्य होणार आहे.
गुंतवणूकदार : सोने १.२१ लाख रुपयांवर; चांदीही उच्चांकावर
नवी दिल्ली : अमेरिकन सरकारचे ‘शटडाउन’ आणि फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किमतींमध्ये बुधवारी मोठी उसळी आली. दिल्लीत सोन्याच्या दरात १,१०० रुपयांनी वाढ झाल्याने ते प्रति १० ग्रॅम १.२१ लाख रुपयांच्या वर पोहोचले आहे. दरम्यान, चांदीचे दर स्थिर राहिले आहेत. चांदी प्रतिकिलो १,५०,५०० रुपये (सर्व करांसह) या विक्रमी पातळीवर आहे.
शेतकरी : गव्हाच्या एमएसपीत ६.५९% वाढ
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी २०२६-२७ या सालाकरिता गव्हाच्या किमान आधारभूत किमतीत ६.५९ टक्के वाढ केली. या निर्णयाने गव्हाचा प्रतिक्विंटल दर १६० रुपये वाढून २,५८५ रुपये असा निश्चित झाला. २०२५-२६ या साली गव्हाचा प्रतिक्विंटल आधारभूत दर २,४२५ रुपये इतका होता. गव्हाच्या किमतीव्यतिरिक्त करडई, मसूर, मोहरी, हरभरा, राई, बार्ली, अशा सहा रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यात आली आहे. करडईच्या प्रतिक्विंटल दरात ६०० रुपये, मसूरच्या प्रतिक्विंटल दरात ३०० रुपये, राई प्रतिक्विंटल दरात २५० रुपये, मोहरीच्या प्रतिक्विंटल दरात २५० रुपये, हरभऱ्याच्या प्रतिक्विंटल दरात २२५ रुपये व बार्लीच्या प्रतिक्विंटल दरात १७० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
कर्जदार : रेपो दर जैसे थे; ५.५ टक्क्यांवर स्थिर राहणार
मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दर ५.५ टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय बुधवारी जाहीर केला. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले की, अमेरिकी टॅरिफच्या परिणामांवर लक्ष ठेवत दर कमी करण्याचा निर्णय पुढे घेता येईल. आरबीआयने चालू आर्थिक वर्षासाठी वृद्धी दर अंदाज ६.५ टक्क्यांवरून ६.८% केला. किरकोळ महागाईचा अंदाज ३.१ टक्क्यांवरून २.६ टक्क्यांवर आणला आहे.