चिंताजनक! रहस्यमय आजाराने १७ जणांचा मृत्यू, जम्मूतील 'हे' गाव 'कंटेनमेंट झोन' घोषित
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 14:39 IST2025-01-22T14:38:17+5:302025-01-22T14:39:50+5:30
खबरदारीच्या उपाययोजना म्हणून सरकारने संपूर्ण गावाला 'कंटेनमेंट झोन' म्हणून घोषित केलं आहे.

फोटो - आजतक
जम्मू आणि काश्मीरमधील राजौरीमध्ये गूढ आजार पसरल्याने भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. राजौरी विभागातील बधाल गावात या गंभीर आजारामुळे आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेले सर्व १७ जण तीन वेगवेगळ्या कुटुंबातील होते. खबरदारीच्या उपाययोजना म्हणून सरकारने संपूर्ण गावाला 'कंटेनमेंट झोन' म्हणून घोषित केलं आहे.
कंटेनमेंट झोन घोषित केल्यानंतर, या गावातील लोक कोणताही सार्वजनिक किंवा खासगी कार्यक्रम आयोजित करू शकणार नाहीत किंवा कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होऊ शकणार नाहीत. इतक्या मोठ्या संख्येने लोकांचा मृत्यू झाल्यानंतरही, एक व्यक्ती अजूनही या आजाराने ग्रस्त आहे आणि त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गावाचं तीन नियंत्रण क्षेत्रात विभाजन
राजौरीचे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी राजीव कुमार खजुरिया यांनी गावाचं तीन नियंत्रण क्षेत्रात विभाजन करण्याचा आदेश जारी केला. पहिल्या क्षेत्रात अशा सर्व कुटुंबांचा समावेश आहे ज्यांच्या घरात मृत्यू झाले आहेत. या गूढ आजाराने बाधित झालेल्या लोकांच्या संपर्कात आलेल्यांना दुसऱ्या कंटेनमेंट झोनमध्ये ठेवले जाईल. या लोकांवर सतत लक्ष ठेवले जाईल. त्यांना राजौरी येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात स्थानांतरित केले जाईल आणि तिथे जाणे अनिवार्य असेल.
याशिवाय, कंटेनमेंट झोन-३ देखील तयार करण्यात आला आहे, ज्यामध्ये उर्वरित घरं समाविष्ट केली जातील. या सर्व झोनमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी अन्न आणि पाण्याची देखरेख करण्यासाठी कर्मचारी देखील तैनात केले जातील. आदेशाचे पूर्ण पालन व्हावे यासाठी पोलीसही तैनात केले जातील.
संरक्षणासाठी घरं केली सील
या आजारामुळे ज्या कुटुंबांनी आपले नातेवाईक गमावले आहेत त्यांची घरं सील करण्याची तयारी सुरू आहे, त्यानंतर कुटुंबातील सदस्यांसह कोणालाही घरात प्रवेश दिला जाणार नाही. घर सील केल्यानंतर, फक्त अधिकृत कर्मचारी आणि अधिकारीच त्यात प्रवेश करू शकतील.
लोकांना अन्न पुरवण्याची अधिकाऱ्यांची जबाबदारी
हा आजार अधिक लोकांमध्ये पसरू नये म्हणून गावात कोणताही सार्वजनिक किंवा खासगी कार्यक्रम आयोजित केला जाणार नाही याची विशेष काळजी घेतली जात आहे. कंटेनमेंट झोनमधील कुटुंबांना पुरवल्या जाणाऱ्या अन्नावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी तैनात अधिकाऱ्यांवर असेल, असंही आदेशात म्हटलं आहे.