अस्वीकारार्ह...! मच्छीमारांवरील गोळीबार प्रकरणावरून भारत संतापला; श्रीलंकेच्या उच्चायुक्तांना केले पाचारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 17:39 IST2025-01-28T17:38:35+5:302025-01-28T17:39:48+5:30
यासंदर्भात भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) तीव्र प्रतिक्रिया दिली आहे आणि श्रीलंकेच्या कार्यवाहक उच्चायुक्तांना बोलावून औपचारिक निषेधही व्यक्त केला आहे...

अस्वीकारार्ह...! मच्छीमारांवरील गोळीबार प्रकरणावरून भारत संतापला; श्रीलंकेच्या उच्चायुक्तांना केले पाचारण
श्रीलंकेच्या नौदलाने डेल्फ्ट बेटाजवळ मंगळवारी सकाळी गोळीबार केला. यात भारताचे पाच मच्छीमार जखमी झाले आहेत. यांपैकी दोन जणांची प्रकृती गंभीर असून इतर तीन मच्छिमारांना किरकोळ दुखापत झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) तीव्र प्रतिक्रिया दिली आहे आणि श्रीलंकेच्या कार्यवाहक उच्चायुक्तांना बोलावून औपचारिक निषेधही व्यक्त केला आहे.
यासंदर्भात बोलताना, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, ही कारवाई अस्वीकार्य आहे. कराईकल बंदराहून मंगळवारी पहाटे डेल्फ्ट बेटाजवळ मासे पकडण्यासाटी गेलेल्या 13 भारतीय मच्छीमारांना श्रीलंकन नौदलाने सागरी सीमा पार केल्याच्या आरोपाखाली अटक केली. यादरम्यान, श्रीलंकन नौदलाने गोळीबार केल्याची माहिती मिळाली होती.
निवेदनानुसार, "हे मच्छीमार परुथी थुराईजवळ मासे पकडत होते. याचवेळी त्यांना श्रीलंकन नौदलाच्या गस्ती घालणाऱ्या बोटीने घेरले. यानंतर, सागरी सीमा पार केल्याच्या आरोपाखाली, एक मासे पकडणारी बोट आणि 13 मच्छीमारांना श्रीलंकन नोदनाने अटक केली. मच्छीमारांकडून बोट तामिळनाडूकडे घेऊन जात असतानाच, श्रीलंकन नौदलाने कथितपणे गोळीबार केला होता. यात एक श्रीलंकन नौदलाचा अधिकारीही होता. यावेळी एका मच्छीमाऱ्याच्या पायाला गोळी लागली, तर दुसरा एक कुठल्या तरी वस्तूच्या प्रहाराने जखमी झाला. अटक करण्यात आलेल्या मच्छीमारांना कांगेसंतुरई पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
"मासेमारी करणाऱ्या बोटीवरील १३ मच्छिमारांपैकी दोघांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर जाफना टीचिंग रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याशिवाय, त्याच बोटीवरील आणखी तीन मच्छिमारांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, जाफना येथील भारतीय वाणिज्य दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी जखमी मच्छिमारांची भेट घेऊन त्यांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे.