मुंबई: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होताच टीडीपीनं मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव आणला. या ठरावावर शिवसेनेची भूमिका काय असणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. याबद्दलचा अंतिम निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबद्दल शिवसेना खासदारांना बोलण्यास मनाई करण्यात आल्याचंही सूत्रांनी सांगितलं आहे. टीडीपीच्या खासदारांनी आज लोकसभेत अविश्वास प्रस्ताव आणला. या प्रस्तावाला काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला. या प्रस्तावाला पन्नासहून अधिक खासदारांचा पाठिंबा असल्यानं लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल करुन घेतला. या प्रस्तावावर शुक्रवारी चर्चा होणार आहे. मोदी सरकारविरोधात पहिल्यांदाच अविश्वास प्रस्ताव दाखल झाल्यानं शुक्रवारचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. लोकसभेतील भाजपाचं संख्याबळ पाहता मोदी सरकारसाठी ही लढाई लुटूपुटूची असेल. भाजपाचे लोकसभेत 273 खासदार आहेत. मित्रपक्षांच्या खासदारांचा आकडा विचारात घेतल्यास ही संख्या 310 वर जाते.एनडीएचे सध्या लोकसभेत 310 खासदार आहेत. यात शिवसेनेच्या 18 खासदारांचा समावेश आहेत. मोदी सरकारविरोधातील एकजूट दाखवण्यासाठी विरोधी पक्ष अविश्वास प्रस्तावाचा वापर करत आहेत. मोदी सरकारसाठी ही लढाई सोपी असली, तरी विरोधकांना यानिमित्तानं आपल्या एकीचं बळ दाखवण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे भाजपावर कायम टीका करणाऱ्या आणि सत्तेत राहूनही सरकारविरोधी भूमिका घेणाऱ्या शिवसेनेला आपल्या बाजूनं ओढण्याचा विरोधकांचा प्रयत्न असेल. त्यामुळे कायम मोदी सरकारवर टीका करणारी शिवसेना शुक्रवारी काय भूमिका घेणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
No Confidence Motion: अविश्वास प्रस्तावावर शिवसेना काय करणार?, उद्धव ठाकरे ठरवणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 5:54 PM