ऊसतोडणी मशिनमध्ये अडकून दोन महिला ठार, बेळगाव जिल्ह्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 15:14 IST2025-12-18T15:13:35+5:302025-12-18T15:14:54+5:30
अथणी पोलिस ठाण्यात रात्री उशिरा नोंद

ऊसतोडणी मशिनमध्ये अडकून दोन महिला ठार, बेळगाव जिल्ह्यातील घटना
शिरगुप्पी : अथणी तालुक्यातील सत्ती गावाच्या शेतात बुधवारी दुपारी ऊसतोडणी सुरू असताना ऊसतोडणीच्या आधुनिक मशीनमध्ये अडकून दोन महिला मजुरांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. बौराव्वा लक्ष्मण कोबडी (वय ६०) आणि लक्ष्मीबाई मल्लप्पा रुद्रगौडर (वय ६५, रा. सत्ती) अशी मृत महिलांची नावे आहेत. याबाबत अथणी पोलिस ठाण्यात रात्री उशिरा नोंद झाली आहे.
याबाबत घटनास्थळी मिळालेली व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू आहे. सत्ती गावच्या हद्दीतील काडगौडा पाटील यांच्या शेतात दुपारी दोनच्या सुमारास आधुनिक मशीनद्वारे ऊसतोडणी सुरू होती. काही मजूर व महिला शेतात कार्यरत होते. बौराव्वा कोबडी आणि लक्ष्मीबाई रुद्रगौडर या दोघी मजुरीसाठी सकाळीच आल्या होत्या. आधुनिक मशीनद्वारे ऊसतोडणी दुपारच्या सुमारास सुरू होती. तोडलेला ऊस मशीनच्या मागील भागात गोळा करण्याचे काम या दोघी महिला करत होत्या.
यावेळी सुरू असलेल्या मशीनचा अंदाज त्यांना आला नाही. दोन्ही महिला मशीनच्या मागील भागात अडकल्या. मशीनमध्ये अडकल्यानंतर गंभीररीत्या जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर तत्काळ मशीन बंद करण्यात आली. तोपर्यंत महिला चिरडून मृत झाल्या होत्या. या घटनेनंतर मृत महिलांच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. दोघींचा दुर्दैवी अंत झाल्यामुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली होती.
या घटनेची माहिती मिळताच अथणी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या दुर्घटनेबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याबाबत हालचाली सुरू होत्या.