कुलगाममध्ये दोन जवान शहीद, ९ जण जखमी; तीन दहशतवादी ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 07:01 IST2025-08-10T07:01:06+5:302025-08-10T07:01:33+5:30
या कारवाईत २० हजारांहून अधिक जवान, डझनभर लढाऊ हेलिकॉप्टर आणि ड्रोनचा वापर करण्यात आला आहे.

कुलगाममध्ये दोन जवान शहीद, ९ जण जखमी; तीन दहशतवादी ठार
सुरेश एस. डुग्गर
जम्मू : दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील अखल परिसरात गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या, या दशकातील सर्वाधिक काळ चाललेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले असून, नऊ जखमी झाले आहेत. आतापर्यंत तीन दहशतवादी ठार झाले असून उर्वरितांचा शोध सुरू आहे. या कारवाईत २० हजारांहून अधिक जवान, डझनभर लढाऊ हेलिकॉप्टर आणि ड्रोनचा वापर करण्यात आला आहे.
ही मोहीम १ ऑगस्टपासून सुरू झाली. पहिल्या दोन दिवसांत तीन दहशतवादी ठार झाले. मात्र घनदाट जंगलात लपलेल्या उर्वरित दहशतवाद्यांशी चकमक अजूनही सुरू आहे. शहीद जवानांची नावे लान्स नायक प्रीतपाल सिंह आणि सिपाही हरमिंदर सिंह अशी आहेत. जम्मू-काश्मीरचे पोलिसप्रमुख नलिन प्रभात व उत्तर कमांडचे लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा यांचा या मोहिमेत समावेश असून, ते मोहिमेवर २४ तास लक्ष ठेवून आहेत. पॅरा कमांडोंनीदेखील सहभाग घेतला आहे. भारतीय सैन्याच्या चिनार कोअरने शहीद जवानांना अभिवादन करत, ‘देशासाठी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाचा आम्ही सन्मान करतो. दुःखाच्या या क्षणी आम्ही कुटुंबीयांसोबत उभे आहोत,’ असे म्हटले.