छत्तीसगडमध्ये भूसुरुंग स्फोटामध्ये दोन पोलिस जखमी
By Admin | Updated: December 2, 2015 13:07 IST2015-12-02T13:04:01+5:302015-12-02T13:07:29+5:30
छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यामध्ये बुधवारी नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटामध्ये दोन पोलिस जवान जखमी झाले.

छत्तीसगडमध्ये भूसुरुंग स्फोटामध्ये दोन पोलिस जखमी
ऑनलाईन लोकमत
रायपूर, दि. २ - छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यामध्ये बुधवारी नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटामध्ये दोन पोलिस जवान जखमी झाले. बुधवारी सकाळी सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि जिल्हा पोलिसांचे संयुक्त पथक मोहिमेवर असताना नक्षलवाद्यांनी हा स्फोट घडवून आणला अशी माहिती कांकेर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक जितेंद्र सिंह मीणा यांनी दिली.
उत्तर बस्तरमध्ये माराकानार गावाजवळच्या एका भागामध्ये सुरक्षा पथके असताना नक्षलवाद्यांनी स्फोट घडवून आणला. या स्फोटामध्ये बैजूराम पोतई आणि संत्राम नेताम हे जिल्हा पोलिस दलाचे दोन जवान जखमी झाले.
घटनास्थळी अतिरिक्त पथक पाठवण्यात आले आहे. दोन्ही जखमी पोलिस जवानांना उपचारासाठी रायपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्लेखोरांना पकडण्यासाठी या भागामध्ये जोरदार शोधमोहिम सुरु झाली आहे.