कोल्हापूर : कर्नाटकातील अलमट्टी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. तेथील जलसंपदा विभागाने मंगळवारी विसर्गही दोन लाख क्युसेकपर्यंत वाढविला आहे. तळकोकणसह कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस आहे. येथील धरणेही पूर्ण क्षमतेने भरल्याने पाण्याचा विसर्ग वाढला आहे. यामुळे पंचगंगा, कृष्णा नदीच्या पाणी पातळीतही प्रचंड वाढली आहे.अलमट्टी धरणाची क्षमता ५१९.६ मीटर आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्र जलसंपदा विभागाच्या पूर नियंत्रण नियोजन बैठकीत १५ ऑगस्टपर्यंत आलमट्टी धरणात ५१७ मीटर पाणी पातळी ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, मध्यंतरी पावसाने उसंत घेतली. पुन्हा पावसाचा जोर वाढला नाही तर धरण पूर्ण क्षमतेने भरणार नाही, म्हणून कर्नाटक जलसंपदा प्रशासनाने ५१७ मीटर पाण्याचा नियम बाजूला ठेवत अधिक प्रमाणात पाणीसाठा केला. गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. परिणामी, बहुतांशी धरणे भरून वाहत आहेत. यामुळे आलमट्टीतील पाण्याची आवक वाढली आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरून त्याचे सर्व २६ दरवाजे खुले झाले आहेत. मंगळवारी सकाळपासूनच आवक वाढत राहिल्याने सायंकाळी दोन लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मात्र, अजूनही पाण्याचा विसर्ग वाढवावा, अशी मागणी होत आहे. विसर्ग आणखी वाढवावा, यासाठी पाठपुरावा सुरू अलमट्टी वेळेआधीच पूर्ण क्षमतेने पाणीसाठा केल्याने कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होत असल्याचा आरोप होत आहे. त्याची दखल स्थानिक प्रशासनाने घेऊन आलमट्टीतून पाण्याचा विसर्ग आणखी वाढवावा, यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
कर्नाटकातील अलमट्टी धरण फुल्ल, दोन लाख क्युसेक विसर्ग सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 13:53 IST