'जबरा फॅन', घरातून दूध आणण्यासाठी पैसे घेऊन ती मुलं आली अमिताभ आणि कोहलीला भेटण्यासाठी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2018 11:17 IST2018-04-16T08:41:47+5:302018-04-16T11:17:21+5:30
मुंबईत आल्यानंतर ते अमिताभ यांच्या जलसा या बंगल्यावर आले पण त्यांची अमिताभशी भेट नाही होऊ शकली.

'जबरा फॅन', घरातून दूध आणण्यासाठी पैसे घेऊन ती मुलं आली अमिताभ आणि कोहलीला भेटण्यासाठी
मुंबई : आपल्या आवडत्या कलाकारासाठी फॅन कोणत्याही थराला जायला तयार असतात. मग ते बॉलिवूड असो अथवा क्रिकेट असो प्रत्येक ठिकाणी चाहते असतातचं. भारतीय तरुणाईच्या गळ्यातील ताईत असेल्या विराट कोहली आणि सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या फॅन्सची संख्या खूप आहे. त्यांच्या एका भेटीला चाहते काहीही करायला तयार होतात. अशीच उत्तरप्रदेशमधील दोन अल्पवयीन मुलं विराट आणि अमिताभ यांची मोठी फॅन आहेत. अमिताभ आणि विराटला भेटण्यासाठी यांनी थेट मुंबई गाठली तेही घरच्यांना न सांगता. यामध्ये एक 10 आणि दुसरा 14 वर्षाचा मुलगा आहे. ही दोन्ही मुलं सख्खे भाऊ आहेत. दोघाही भावांची नावं अमन आणि भावेश अशी आहेत. हे दोघेही मथुरेच्या गौरानगर कॉलनीत राहणारे आहेत.
मथुरा येथील ही दोन मुलं घरातून दूध आणण्यासाठी पैसे घेऊन निघाले ते थेट ट्रेन मध्ये बसून मुंबईला आले. त्यावेळी त्यांच्या खिशात दुधाच्या पैशाशिवाय सोबत अपली पॉकेटमनी होता. मुंबईत आल्यानंतर ते अमिताभ यांच्या जलसा या बंगल्यावर आले पण त्यांची अमिताभशी भेट नाही होऊ शकली. नंतर दुसऱ्या मित्राने विराटला भेटण्याची इच्छा व्यक्त केली पण रात्र होत असल्यामुळे दोघेही परत जाण्यासाठी स्टेशनवर जाताना चुकून ते महिलांच्या डब्ब्यात बसले. त्यावेळी पोलिसांनी त्यांना हटकलं असता सर्व प्रकार मुंबई पोलिसांच्या लक्षात आला.
पोलिसांनी त्या दोघांची चौकशी केली असता सर्व प्रकार समोर आला. ही दोन्ही मुलं विराट कोहली आणि अमिताभ यांना भेटण्यासाठी मुंबईला आले होते. पोलिसांनी पोलिसांनी त्याच्या घरी संपर्क केल्यानंतर दोघेही घरून बेपत्ता असल्याचे समोर आले. घरच्यांनी पोलिसात दोघांचे अपहरण झाल्याच्या संशयावरून तक्रार केलेली होती. पोलिसांच्या सूचनेनंतर या दोघांचे कुटूंबिय मुंबईत आले आणि त्यांनी या दोघांनाही आपल्या घरी परत आणलं.