कार ब्रेक पॅडलखाली पाण्याची बाटली आल्याने भरधाव कार रस्त्याच्या कडेला असलेल्या ट्रॉलीला धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन व्यावसायिकांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघातउत्तर प्रदेशमधील कुंडली-गाझियाबाद-पलवल एक्स्प्रेस वे वर गाझियाबाद येथे झाला.
या अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही व्यावसायिक एक्स्प्रेसवेवरून जात असताना अचानक कारमध्ये पडलेली पाण्याची बाटली ब्रेक पॅडलखाली आली. त्यामुळे ब्रेक न लागल्याने कार एक्स्प्रेस वेच्या कडेला असलेल्या ट्रॉलीमध्ये घुसली. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करून नातेवाईकांकडे सुपुर्द केले आहेत.
अपघातातबाबत अधिक माहिती देताना पोलीस अधिकारी बिजेंद्र सिंह सांनी सांगितले की, एका वॅगनआर कारने एका ट्ऱॉलीला मागून धडक दिल्याची माहिती सोमवारी संध्याकाळी पलवल येथील चांदहट पोलीस ठाण्यामध्ये सोमवारी संध्याकाळी मिळाली होती. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा मृत्यू झालेल्या दोन्ही व्यक्ती मेरठ येथील रहिवासी असल्याचे तसेच त्यांची नावं अभिनव अग्रवाल आणि अमित अग्रवाल अशी असल्याचे समोर आले. दोघेही मित्र होते. त्यांच्यापैकी अमित याचं पूजा भांडाराचं दुकान आहे. तसेच येणाऱ्या जन्माष्टमीनिमित्त सामान खरेदी करण्यासाठी त्याने मथुरा-वृंदावन येथे खरेदीसाठी जाण्याचे ठरवले होते. तसेच कारने ते मथुरेला जात होतो. तेव्हा वाटेत हा अपघात झाला.
तपास अधिकाऱ्यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार अपघातग्रस्त कार ही खूप वेगात होती. ट्ऱ़ॉलीला धडकल्यानंतर अर्ध्याहून अधिक कार ट्रॉलीमध्ये घुसली होती. त्यामुळे खूप खटपटी करून दोन्ही मृतदेह बाहेर काढावे लागले होते. कारची पाहणी केल्यावर ड्रायव्हरच्या पायांजवळ पाण्याची बाटली असल्याचे दिसून आले. त्यामुळे पाण्याची बाटली ब्रेक पॅडलच्या खाली आल्याने ब्रेक लागले नाहीत आणि हा अपघात झाला, असा अंदाज वर्तवला जात आहे.