बीटीपीच्या २ आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढला, गेहलोत सरकारला दोन वर्षांपासून होते समर्थन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 08:06 IST2020-12-12T05:06:25+5:302020-12-12T08:06:30+5:30
Rajasthan Politics : राजस्थानातील काँग्रेसचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या सरकारला दिलेला पाठिंबा भारतीय ट्रायबल पार्टी (बीटीपी) या पक्षाच्या दोन आमदारांनी शुक्रवारी काढून घेतला आहे.

बीटीपीच्या २ आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढला, गेहलोत सरकारला दोन वर्षांपासून होते समर्थन
जयपूर : राजस्थानातील काँग्रेसचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या सरकारला दिलेला पाठिंबा भारतीय ट्रायबल पार्टी (बीटीपी) या पक्षाच्या दोन आमदारांनी शुक्रवारी काढून घेतला आहे. या राज्यात झालेल्या पंचायत निवडणुकात काँग्रेसला हार पत्करावी लागली होती. त्यानंतर ही घडामोड झाली.
राजस्थानमधील काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी बंडखोरीची भूमिका घेतल्याने अशोक गेहलोत यांचे सरकार डळमळीत झाले होते. मात्र त्यावर मार्ग काढत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ऑगस्ट महिन्यात आपल्या सरकारवरील विश्वासदर्शक ठराव मंजूर करून घेतला.
त्या वेळी बीटीपीच्या दोन आमदारांनी गेहलोत सरकारला समर्थन दिले होते. २०१८ पासून बीटीपीचे आमदार गेहलोत सरकारला पाठिंबा देत होते. (वृत्तसंस्था)
त्या आमदारांचा आरोप काय?
पंचायत निवडणुकात आम्हाला व आमच्या समर्थकांना काँग्रेसने मदत केली नाही, असा बीटीपीच्या राजकुमार रोट व रामप्रसाद या दोन आमदारांचा आरोप आहे. राजस्थानमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष व सरपंच या दोन पदांसाठी अनुक्रमे २० जिल्हा परिषदा तसेच २२१ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका झाल्या. त्यातील २० जिल्हा परिषदांत अध्यक्षपदासाठी भाजपचे १२, काँग्रेसचे ५ व तीन अपक्ष उमेदवार विजयी झाले.