22 लाख किमतीच्या टोमॅटोने भरलेला ट्रक पलटला; लुटीपासून वाचण्यासाठी पोलिसांनी लढवली शक्कल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 14:26 IST2023-07-17T14:23:47+5:302023-07-17T14:26:17+5:30
तेलंगणातील आदिलाबाद जिल्ह्यात टोमॅटो घेऊन जाणारा ट्रक अनियंत्रित होऊन उलटला.

22 लाख किमतीच्या टोमॅटोने भरलेला ट्रक पलटला; लुटीपासून वाचण्यासाठी पोलिसांनी लढवली शक्कल
देशभरात टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे होत चालले आहे. गरिबांनी तर टोमॅटो घेणं बंद केलं आहे. सध्या टोमॅटोची गणना सर्वात महागड्या भाज्यांमध्ये केली जात आहे. एवढंच नाही तर पोलीस बंदोबस्तात मंडईंमध्ये टोमॅटोची विक्री होत असल्याची परिस्थिती आहे. चोरीच्या घटना घडू नयेत म्हणून शेतकरी रात्रभर शेतात पहारा देत आहेत.
याच दरम्यान तेलंगणातील आदिलाबाद जिल्ह्यात टोमॅटो घेऊन जाणारा ट्रक अनियंत्रित होऊन उलटला. त्याचवेळी लोकांनी टोमॅटो लुटण्याआधीच पोलीस तिथे पोहोचले आणि त्यांनी शक्कल लढवली, पोलिसांनी तेथे पोहोचून कोणतीही घटना घडू नये म्हणून बंदोबस्त ठेवला होता.
कर्नाटकातील कोलार जिल्ह्यात सर्वाधिक टोमॅटोचे पीक घेतले जाते. येथून टोमॅटो भरून एक ट्रक दिल्लीला जात होता. याच दरम्यान तेलंगणातील आदिलाबाद जिल्ह्यातील मावळा बायपासजवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-44 (NH-44) वरून जात असताना बाईक चालकाला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रक पलटी झाला.
ट्रक पलटी होताच मोठ्या प्रमाणात टोमॅटो खाली पडले. या ट्रकमधून सुमारे 18 टन टोमॅटो वाहून नेले जात होते. त्याची किंमत जवळपास 22 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचून टोमॅटोला पूर्ण सुरक्षा दिली. तिथे येणारे-जाणारे लोक नुसते बघत होते आणि निघून जात होते. मिळालेल्या माहितीनुसार, टोमॅटोचा भाव बाजारात 120 ते 150 रुपयांपर्यंत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.