हैदराबादमध्ये टीआरएस सर्वात माेठा पक्ष; महापालिकेत त्रिशंकू स्थिती, MIM च्या हाती सत्तेची चावी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2020 07:40 IST2020-12-05T02:24:45+5:302020-12-05T07:40:13+5:30
भाजपची ४८ जागांपर्यंत झेप; एनडीएमधला जुना मित्रपक्ष तेलगू देसम पार्टीला या निवडणुकीत भाेपळा मिळाला आहे. ती जागा भाजपने भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे.

हैदराबादमध्ये टीआरएस सर्वात माेठा पक्ष; महापालिकेत त्रिशंकू स्थिती, MIM च्या हाती सत्तेची चावी
हैदराबाद : महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समितीला बहुमतापासून वंचित राहावे लागले असले तरीही एमआयएमच्या पाठिंब्याने सत्ता स्थापनेचा मार्ग माेकळा आहे. हैदराबादचे भाग्यनगर करण्याच्या इराद्याने निवडणूक लढविणाऱ्या भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून वंचित राहावे लागले तरीही चार वरून ४८ जागांपर्यंत झेप मारली आहे. टीआरएसला ५५ जागा मिळाल्या आहेत.
महापालिकेच्या १५० जागांसाठी ४६.६ टक्के मतदान झाले हाेते. भाजपने ही निवडणूक खूप प्रतिष्ठेची केली हाेती. गृहमंत्री अमित शहा, पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री याेगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचार केला. याेगी आदित्यनाथ यांनी हैदराबादचे ‘भाग्यनगर’ करण्याचे विधान करुन मतदारांना साद घातली हाेती. तर अमित शहा यांनी जंगी राेड शाे करुन हैदराबादमधील निझामशाही संपवाची आहे, असे वक्तव्य करुन ओवैसी आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यावर टीका केली हाेती.
टी.आर.एस. एका जागेवर मतमोजणीत आघाडीवर असला तरी न्यायालयाच्या आदेशावरून मतमोजणीला स्थगिती देण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र माेदीही लस पाहणीच्या निमित्ताने याच काळात हैदराबादमध्ये गेले हाेते. याचा पक्षाच्या कामगिरीवर निश्चतच परिणाम झाला असून चार वरून ४८ जागांपर्यंत मजल मारता आली आहे. एनडीएमधला जुना मित्रपक्ष तेलगू देसम पार्टीला या निवडणुकीत भाेपळा मिळाला आहे. ती जागा भाजपने भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे.
सत्ताधाऱ्यांना झटका
टीआरएसला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. प्रचारामध्ये स्थानिक प्रश्न मांडले नाही. तसेच काही वर्षांमधील कामगिरी मतदारांची नाराजी ओढावणारी ठरली. तसेच एमआयएमसाेबतच्या छुप्या युतीवरुनही टीआरएसवर टीका झाली. तरीही याच छुप्या युतीच्या जाेरावर सत्तास्थापनेचा मार्ग माेकळा हाेऊ शकताे.
भाजपला ‘नाे एन्ट्री’ : असदुद्दीन ओवैसींच्या पक्षाला यंदा ४३ जागा मिळाल्या. परंतु, ओवैसींच्या गडात कमळाला प्रवेश मिळाला नाही काँग्रेसच्याही पदरात पूर्वीप्रमाणेच दाेन जागा आहेत.