ट्रेन तिकीट बुकिंगचे नियम बदलले, या लोकांना मिळणार लोअर बर्थ; झोपण्याची वेळही ठरली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 10:20 IST2025-11-01T10:19:21+5:302025-11-01T10:20:13+5:30
Train Ticket Booking Rules: रेल्वेतील लोअर बर्थ मिळण्यासंदर्भात प्रवासी वारंवार तक्रार करत असतात. यामुळे यासंदर्भातील नियमासंदर्भात माहिती असणेही अत्यंत आवश्यक आहे...

ट्रेन तिकीट बुकिंगचे नियम बदलले, या लोकांना मिळणार लोअर बर्थ; झोपण्याची वेळही ठरली!
Train Ticket Booking Rules: भारतीय रेल्वेची तिकीट बुकिंग प्रक्रिया आणखी सहज सोपी आणि पारदर्शक असावी या दृष्टीने भारतीय रेल्वे सातत्याने प्रयत्न करत असते. याच दृष्टीने, या वर्षाच्या सुरुवातीला रेल्वेने ‘RailOne’ नावाचे सुपर अॅप सुरू केले आहे. या अॅपद्वारे प्रवासी आरक्षित तसेच अनारक्षित तिकीटही बुक करू शकतात. याशिवाय रेल्वेशी संबंधित विविध प्रवासी सेवांसाठीही हे अॅप ‘वन-स्टॉप सोल्यूशन’ म्हणून काम करते.
रेल्वेतील लोअर बर्थ मिळण्यासंदर्भात प्रवासी वारंवार तक्रार करत असतात. यामुळे यासंदर्भातील नियमासंदर्भात माहिती असणेही अत्यंत आवश्यक आहे. संगणकीकृत आरक्षण प्रणालीत वरिष्ठ नागरिक, 45 वर्षांवरील महिला प्रवासी तसेच गर्भवती महिलांना लोअर बर्थ देण्याची विशेष तरतूद करण्यात आली आहे. मात्र ही सुविधा आसनांच्या उपलब्धतेवर अवलंबून आहे. महत्वाचे म्हणजे, तिकीट तपासणी अधिकाऱ्यांना (TTE) देखील प्रवासादरम्यान रिकामा असलेला लोअर बर्थ पात्र प्रवाशांना देण्याचा अधिकार देण्यात आला आहे. म्हणजेच आरक्षणावेळी लोअर बर्थ न मिळाल्यास आणि एखादा लोअर बर्थ रिकामा असल्यास, टीटीई तो बर्थ संबंधित प्रवाशाला देऊ शकतो.
ऑनलाइन बुकिंग करताना प्रवाशांकडे “बुक ओनली इफ लोअर बर्थ इज अवेलेबल” हा विशेष पर्यायही उपलब्ध आहे. हा पर्याय निवडल्यास लोअर बर्थ नसेल तर तिकीटच बुक होणार नाही, यामुळे प्रवाशांना आपल्या पसंतीची आसनव्यवस्था निश्चित करता येते.
झोपण्याचा नियम -
रेल्वेच्या नियमानुसार रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत प्रवाशांना आपल्या निश्चित बर्थवर झोपण्याची परवानगी असते, तर दिवसा बसण्याची व्यवस्था असते. RAC तिकिटधारक आणि साइड अप्पर बर्थ असलेल्या प्रवाशांमध्ये दिवसा बसण्याची जागा शेअर केली जाते, मात्र रात्री लोअर बर्थचा अधिकार फक्त त्या बर्थधारकाकडेच असतो.
याशिवाय, आरक्षित तिकिटांसाठीची अग्रिम आरक्षण मुदत (ARP) 120 दिवसांवरून कमी करून 60 दिवस करण्यात आली आहे, म्हणजे प्रवासी आता प्रवासाच्या तारखेपूर्वी 60 दिवसांपर्यंत तिकिटे बुक करू शकतात.