Tours image makeover as Congress plans to relaunch Rahul Gandhi as president | राहुल गांधी पुन्हा येणार, काँग्रेसचे अध्यक्ष होणार; रिलॉन्चची जोरदार तयारी

राहुल गांधी पुन्हा येणार, काँग्रेसचे अध्यक्ष होणार; रिलॉन्चची जोरदार तयारी

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा देणाऱ्या राहुल गांधींचं रिलॉन्चिंग करण्याची तयारी काँग्रेसनं सुरू केली आहे. राहुल गांधींना रिलॉन्च करण्यासाठी त्यांच्या सल्लागारांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केल्याचं वृत्त 'इकॉनॉमिक टाईम्स'नं दिलं आहे. 

राहुल गांधींची प्रतिमा बदलण्यासाठी काँग्रेसची टीम कामाला लागली आहे. याचाच भाग म्हणून राहुल गांधी देशभरात दौरे करणार आहेत. राहुल गांधी सभांच्या माध्यमातून जनतेला संबोधित करणार असून त्यामध्ये ते रोजीरोटी आणि घटनेच्या रक्षणाचा मुद्द्यावर जोर देतील. सध्या देशाची अर्थव्यवस्था संकटात आहे. याशिवाय सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी यासारख्या मुद्द्यांवरुन वातावरण तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी त्यांच्या भाषणातून रोजगार आणि संविधानाचं संरक्षण हे दोन मुद्दे उपस्थित करतील. 

जूनमध्ये पन्नाशीचे होणारे राहुल गांधी येत्या मंगळवारी राजस्थानात एका जनसभेला संबोधित करणार आहेत. मोदी सरकारच्या काळात वाढलेली बेरोजगारी हा त्यांच्या भाषणाचा मुख्य विषय असेल. 'राहुल गांधींनी पक्षाचं नेतृत्व करावं अशी सगळ्यांचीच इच्छा आहे. त्यांनी अद्याप यावर भाष्य केलेलं नाही. मात्र त्यांनी याबद्दलचा निर्णय घ्यावा याची आम्ही वाट पाहत आहोत,' असं अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव के. सी. वेणुगोपाल यांनी सांगितलं. 

वाढती बेरोजगारी, शेतीच्या समस्या आणि संविधान वाचवण्याची आवश्यकता हे राहुल गांधी यांच्या भाषणाचे प्रमुख मुद्दे उपस्थित असतील, अशी माहिती वेणुगोपाल यांनी दिली. सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी यासारख्या मुद्द्यांवरुन मोदी सरकार देशात दुफळी निर्माण करण्याचं काम करत असून शेतकऱ्यांच्या समस्या, रोजगार, महागाई हे देशापुढील खरे प्रश्न असल्याचं राहुल त्यांच्या भाषणातून जनतेला सांगतील, असंदेखील ते पुढे म्हणाले.

उद्या राजस्थानात जनसभा घेतल्यानंतर ३० जानेवारीला राहुल गांधी केरळमध्ये जनसभेला संबोधित करतील. यानंतर ते झारखंडसह काँग्रेशासित राज्याच्या दौऱ्यांना सुरुवात करतील. या दौऱ्यांनंतर राहुल भाजपाशासित राज्यांमध्ये सभा घेतील. 
 

Web Title: Tours image makeover as Congress plans to relaunch Rahul Gandhi as president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.