पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 06:19 IST2025-05-04T06:18:59+5:302025-05-04T06:19:08+5:30
श्रीनगरच्या उपनगरांमधील पर्वतरांगांच्या पायथ्याशी हाॅटेलमधील पर्यटकांवर हल्ला होण्याचे मिळाले होते संकेत, मात्र शोधमोहिमेसह सतर्कता बाळगूनही अखेर पहलगामचे अघटित घडलेच

पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली/श्रीनगर : जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरच्या उपनगरांमध्ये विशेषतः झबरवान पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेल्या हाॅटेलमध्ये थांबलेल्या पर्यटकांना दहशतवादी लक्ष्य करू शकतात, असा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला होता अशी माहिती या प्रकरणाशी निगडित असलेल्या अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. त्यामुळे या भागातील सुरक्षेत वाढ करून डाचीगाम, निशात परिसरात मोठ्या प्रमाणावर झडती घेण्यात आली. मात्र काही संशयास्पद न आढळल्याने ही मोहीम २२ एप्रिल रोजी थांबविण्यात आली. नेमके त्याच दिवशी दहशतवाद्यांनी पहलगाममधील बैसरन घाटीत पर्यटकांवर गोळीबार करून २६ जणांची हत्या केली.
गुप्तचर यंत्रणांच्या इशाऱ्यानुसार वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या सर्व परिसरावर लक्ष केंद्रित केले होते. त्या परिसरात हाती घेतलेल्या शोधमोहिमेत कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळून आली नाही. त्यामुळे २२ एप्रिल रोजी शोधमोहीम थांबविण्यात आली. त्याच दिवशी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, बैसरन घाटी येथे दोन स्थानिक दहशतवादी पर्यटकांमध्ये मिसळले. त्यांनी गोळीबार करून काही पर्यटकांना एका फूड कोर्ट कॉम्प्लेक्समध्ये नेले. तिथे आणखी दोन पाकिस्तानी दहशतवादी होते. त्यांनी २६ जणांची हत्या केली. लोकांमध्ये भीती निर्माण व्हावी आणि देशात इतर ठिकाणी स्थानिक लोकांकडून काश्मिरी नागरिकांवर हल्ले व्हावेत, अशा हेतूनेही हा दहशतवादी हल्ला करण्यात आला.
‘त्या’ जवानाची सेवेतून हकालपट्टी
श्रीनगर : पाकिस्तानी महिलेशी विवाह केल्याची माहिती दडवून ठेवल्याचा आरोप असलेला सीआरपीएफचा जवान मुनीर अहमदची सेवेतून हकालपट्टी केली आहे. त्याच्या या कृत्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी शनिवारी सांगितले. तो या दलाच्या ४१व्या बटालियनमध्ये कार्यरत होता. या जवानाने मीनल खान या पाकिस्तानी महिलेशी विवाह केला. व्हिसा संपला असतानाही ती भारतात राहत होती. या गोष्टी दडवून सेवा नियमांचा भंग केला असल्याचा त्याच्यावर ठपका ठेवला होता.