झायरा वसीम छेडछाड : विमानातच मी माफी मागितली होती, अनवधानाने माझा पाय लागला : आरोपी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2017 17:53 IST2017-12-12T17:28:37+5:302017-12-12T17:53:11+5:30

काकांचं निधन झालं होतं, त्या ठिकाणाहून शोकसभेवरून आम्ही परतत होतो. झोप पूर्ण न झाल्याने मी थकलो होतो. विमानात जाताच मला त्रास देऊ नका अशी विनंती...

Touched her unintentionally, I apologised, says man accused of molesting Dangal star during flight | झायरा वसीम छेडछाड : विमानातच मी माफी मागितली होती, अनवधानाने माझा पाय लागला : आरोपी

झायरा वसीम छेडछाड : विमानातच मी माफी मागितली होती, अनवधानाने माझा पाय लागला : आरोपी

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री झायरा वसीम हिच्यासोबत विमानात छेडछाड केल्याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी विकास सचदेवने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळताना पाय केवळ अनवधानाने लागला होता असं म्हटलं आहे. 

काकांचं निधन झालं होतं, त्या ठिकाणाहून शोकसभेवरून आम्ही परतत होतो. झोप पूर्ण न झाल्याने मी थकलो होतो. विमानात जाताच मला त्रास देऊ नका अशी विनंती मी विमानातील कर्मचा-यांना केली होती. तसंच झोप पूर्ण न झाल्याने विमानात जेवण न करण्याचंही मी ठरवलं होतं. त्यामुळे सीटवर बसल्यावर मी लगेच झोपलो, झायराला पाय लागल्याचं लक्षात येताच मी विमानातच तिची माफीही मागितली होती असं विकासने म्हटलं आहे.

माझे पती निर्दोष, पाय चुकून लागला होता : आरोपीची पत्नी

या प्रकरणी आरोपी विकासची पत्नी समोर आली असून विकासचा झायराला चुकून धक्का लागला होता असं त्यांनी म्हटलं आहे. विमानातून उतरण्यापूर्वी झायराची विकासने माफी देखील मागितली होती आणि तिने त्यावेळी माफी स्वीकारली देखील होती असं विकासच्या पत्नीने म्हटलं आहे.
विकासच्या काकांचं निधन झालं होतं, त्या ठिकाणाहून आम्ही परतत होतो, त्यामुळे विकास मानसिकदृष्टया थकला होता, थकाव असल्यामुळे त्याला झोप लागली आणि झोपेत चुकून त्यांचा पाय झायराला लागला, माझे पती निर्दोष आहेत असं दिंडोशी न्यायालयाच्या बाहेर पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या.   

काय आहे प्रकरण -

झायरा वसीमनं आपल्या इन्स्टाग्रामवर विमानातील छेडछाडीचा व्हिडीओ पोस्ट केला होता.  झायरा वसीम शनिवारी दिल्लीहून आईसह मुंबईला विस्तारा एअरलाइन्सच्या विमानातून येत होती. तिने बिझनेस क्लासचे तिकीट काढले होते. ‘1 एफ’ सीटवर ती व बाजूला तिची आई तर मागील ‘2 एफ’ वर 45 वर्षांचा एक इसम बसलेला होता. नऊ वाजून 20 मिनिटांनी विमानाने उड्डाण घेतले. थोड्याच वेळात संबंधित प्रवाशाने पायाच्या बोटाने झायराच्या मान व पाठीला स्पर्श केला. त्याबाबत सांगूनही दुर्लक्ष करत राहिल्याने अखेर ती घाबरून किंचाळली. मात्र कोणीही कर्मचारी किंवा प्रवासी तेथे आला नाही. झायराने या प्रकाराचे मोबाईलवर शूट करण्याचा प्रयत्न केला, परंतु विमानातील अंधूक प्रकाशामुळे ते शक्य झाले नाही. सुमारे दहा मिनिटे हा सगळा प्रकार सुरू होता. ‘विस्तारा एअरलाइन्स’च्या विमानातून दिल्ली- मुंबई प्रवास करीत असताना घडलेल्या धक्कादायक प्रकाराची माहिती 17 वर्षीय झायराने स्वत: विमानातून उतरल्यानंतर मध्यरात्री ‘इन्स्टाग्राम’वर शेअर केली. ती घटना सांगताना तिला अश्रू रोखता आले नाहीत. त्यानंतर जगभरातून या घटनेबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. 
मुंबई पोलिसांनी या प्रकाराची दखल घेत संबंधित प्रवाशाविरुद्ध विनयभंग व बालक अत्याचार प्रतिबंधक कलम (पॉस्को) गुन्हा दाखल केला होता. त्याचप्रमाणे राष्ट्रीय व राज्य महिला आयोगानेही या प्रकरणाची दखल घेतली होती.  जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती, कुस्तीपटू बबिता फोगाट यांच्यासह राजकीय, सामाजिक व बॉलिवूडमधील विविध मान्यवरांनी याबाबत सोशल मीडियावरुन निषेध नोंदवत संबंधित विकृत प्रवाशावर कठोर कारवाईची मागणी केली होती.
 

Web Title: Touched her unintentionally, I apologised, says man accused of molesting Dangal star during flight