बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 05:54 IST2025-10-01T05:53:56+5:302025-10-01T05:54:37+5:30
निवडणूक आयोगाकडून अंतिम यादी प्रसिद्ध; ऑगस्टमध्ये ६५ लाख मतदारांचे स्थलांतर

बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
नवी दिल्ली: निवडणूक आयोगाने बिहारमधील मतदारांची अंतिम यादी प्रकाशित केली असून, यात एकूण ७.४२ कोटी मतदारांची नावे आहेत. जून महिन्यात विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) सुरू झाल्यापासूनच्या संख्येत ४७ लाखांपेक्षा जास्त घट झाल्याचे समोर आले आहे. अंतिम यादीतील मतदारांची संख्या मसुदा यादीतील ७.२४ कोटी या संख्येपेक्षा जास्त असल्याचे सर्वेक्षणाअंती दिसत आहे. ऑगस्टमध्ये ६५ लाख मतदारांची नावे स्थलांतर, मृत किंवा गैरहजेरीसह विविध कारणांमुळे वगळण्यात आली होती.
बिहारच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, १ ऑगस्ट रोजी मसुदा यादी प्रकाशित झाल्यापासून २१.५३ लाख पात्र मतदारांची नावे यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. तथापि, दावे आणि हरकतीच्या टप्प्यात मसुदा यादीतील ३.६६ लाख मतदारांची नावे वगळण्यात आली. अंतिम यादी प्रकाशित होईपर्यंत मसुदा यादीतील नावे अपात्र असल्याचे कोणत्या कारणांवरून आढळले, हे मात्र आयोगाने स्पष्ट केलेले नाही. निवडणूक प्रक्रियेच्या कालावधीत पूरक यादी प्रकाशित झाल्यानंतर अंतिम आकड्यांमध्ये होऊ शकतो. थोडासा बदल होऊ शकतो.
विरोधकांच्या मतचोरीचे पितळ उघडे
मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या जदयूचे प्रवक्ते नीरजकुमार यांनी म्हटले आहे की, विरोधकांच्या मतचोरीचे पितळ आता उघडे पडले आहे. अंतिम मतदारयादीत लाखो नवीन नावे समाविष्ट झाली आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष राजेश कुमार यांनी वगळलेल्या नावांबाबत चिंता व्यक्त केली. एसआयआरशी संबंधित मुद्दे संपलेले नाहीत. आम्ही शेवटपर्यंत लढू, असे ते म्हणाले.
लवकरच निवडणुकांची घोषणा?
बिहार विधानसभा निवडणुकांची लवकरच होईल एसआयआर मोहिमेवरून वाद निर्माण झाला होता. विरोधकांचे म्हणणे होते की, मतदारांची नावे चुकीच्या पद्धतीने हटवण्यासाठी ही मोहीम हाती घेतली आहे. यावरून काही पक्षांनी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातही नेले आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासह भाजप नेत्यांनी एसआयआर मोहीम घुसखोरांना बाहेर करण्यासाठी गरजेची आहे. कारण विरोधक त्यांना मताधिकार देऊ इच्छित असल्याचे म्हटले आहे.
पाटणा जिल्ह्यातील स्थिती
पाटणा: पाटणा जिल्ह्यातील १४ विधानसभा मतदारसंघांतील एकूण मतदारांची संख्या सुमारे ४८.१५ लाख होती. ही संख्या एक ऑगस्ट रोजी प्रकाशित केलेल्या मसुदा मतदार यादीच्या तुलनेत १.६३ लाखांनी अधिक झाली आहे. जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या २२.७५ लाख होती. दीघा मतदारसंघात सर्वाधिक ४.५६ लाख मतदार आहेत.