स्वच्छ भारत उपकरातून महिन्याभरात ३२९ कोटी जमा
By Admin | Updated: December 22, 2015 17:10 IST2015-12-22T17:10:14+5:302015-12-22T17:10:14+5:30
स्वच्छ भारत अभियानाच्या निधीसाठी करपात्र सेवांवर लावलेल्या ०.५ टक्के उपकरातून केंद्र सरकारच्या तिजोरीत महिन्याभरात ३२९.६ कोटी रुपये जमा झाले आहेत.

स्वच्छ भारत उपकरातून महिन्याभरात ३२९ कोटी जमा
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २२ - स्वच्छ भारत अभियानाच्या निधीसाठी करपात्र सेवांवर लावलेल्या ०.५ टक्के उपकरातून केंद्र सरकारच्या तिजोरीत महिन्याभरात ३२९.६ कोटी रुपये जमा झाले आहेत. स्वच्छ भारत अभियानासाठी सरकारने १५ नोव्हेंबर ते १६ डिसेंबर २०१५ या कालावधीत उपकराच्या माध्यमातून ३२९.६ कोटी जमा केल्याची माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी राज्यसभेत लेखी उत्तराव्दारे दिली.
१५ नोव्हेंबर ते ३१ मार्च २०१६ पर्यंत उपकरातून ३,७५० कोटी जमा होतील असा अंदाज असल्याचे सिन्हा यांनी सांगितले. उपकरातून जमा होणारा पैसा विविध राज्य सरकारांना स्वच्छ भारत अभियानासाठी दिला जाणार आहे.
पुढच्या आर्थिक वर्षामध्ये स्वच्छ भारत अभियानासाठी किती निधी जमा होईल त्याची अंदाजित रक्कम ठरली नसल्याचे सिन्हा यांनी सांगितले. स्वच्छ भारत उपकरामुळे सेवा कर १४ टक्क्यांवरुन १४.५ टक्के झाला आहे.