झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 12:12 IST2025-09-15T12:11:02+5:302025-09-15T12:12:04+5:30
Jharkhand Encounter: झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यात सुरक्षा दलांनी मोठी कारवाई करत तीन माओवाद्यांना ठार केले.

झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यात सुरक्षा दलांनी मोठी कारवाई करत तीन माओवाद्यांना ठार केले. यातील एका माओवाद्यावर तब्बल १ कोटी रुपयांचे बक्षीस होते. ही चकमक सोमवारी सकाळी हजारीबागच्या पंतित्री जंगलात झाली. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली.
२०९ कोब्रा (COBRA) बटालियन आणि झारखंड पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. माओवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या जोरदार गोळीबारात तीन माओवादी ठार झाले. चकमकीनंतर घटनास्थळावरून तीन एके-४७ रायफल जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईत कोणत्याही सुरक्षा जवानाला दुखापत झाल्याचे वृत्त नाही. ठार झालेल्या माओवाद्यांची नावे सहदेव सोरेन, रघुनाथ हेम्ब्रम आणि वीरसेन गंजू अशी आहेत.
२०२५ या वर्षात २०९ कोब्रा बटालियनने नक्षलवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईत मोठे यश मिळवले आहे. आतापर्यंत या बटालियनने २० नक्षलवाद्यांना ठार केले आहे आणि ३ नक्षलवाद्यांना अटक केली आहे. याशिवाय, मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करून नक्षलवाद्यांच्या अड्ड्यांवर छापे टाकण्यात आले आहेत. या कारवाईमुळे नक्षलवाद्यांना मोठा धक्का बसला असून, त्यांच्या हालचालींवर परिणाम झाला आहे. सध्या, या भागात सुरक्षा दलांची शोधमोहीम सुरू आहे.