एनडीएमधील एकजूट दाखवण्यासाठी नड्डांच्या घरी जमले बडे नेते, ललन सिंह, चंद्राबाबूही उपस्थित
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 13:38 IST2024-12-25T13:34:16+5:302024-12-25T13:38:55+5:30
NDA IMP Meeting: भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी एनडीएच्या बड्या नेत्यांची बैठक सुरू झाली असून, या बैठकीला एनडीएमधील मित्रपक्षांच्या नेत्यांसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेही उपस्थित आहेत.

एनडीएमधील एकजूट दाखवण्यासाठी नड्डांच्या घरी जमले बडे नेते, ललन सिंह, चंद्राबाबूही उपस्थित
मागच्या काही दिवसांपासून देशपातळीवर घडत असलेल्या घडामोडींमुळे भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीला तडे जातात की काय अशी चर्चा सुरू झाली होती. दरम्यान, आज भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी एनडीएच्या बड्या नेत्यांची बैठक सुरू झाली असून, या बैठकीला एनडीएमधील मित्रपक्षांच्या नेत्यांसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेही उपस्थित आहेत. या बैठतीमध्ये एनडीएतील घटक पक्षांमध्ये उत्तम समन्वय राखण्याच्या दृष्टीने विचार विनिमय होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
या बैठकीला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासह गृहमंत्री अमित शाह, तेलुगू देसमचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू, शिवसेनेचे नेते प्रतापराव जाधव, जेडीयूचे नेते ललन सिंह, जेडीएसचे नेते एच.डी. कुमारस्वामी, निषाद पार्टीचे संजय निषाद, हम पार्टीचे जीतनराम मांझी, अपना दलाच्या अनुप्रिया पटेल यांच्यासह एनडीएचे इतर नेते उपस्थित आहेत.
#WATCH | Delhi: NDA leaders' meeting underway at the residence of Union Minister and BJP chief JP Nadda.
— ANI (@ANI) December 25, 2024
Union Home Minister Amit Shah, Andhra Pradesh CM N Chandrababu Naidu, Union Minister of Civil Aviation, Ram Mohan Naidu Kinjarapu also present. pic.twitter.com/vZ92VncnGQ
या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी एनडीएमधील मित्र पक्ष असलेल्या भारत धर्मजनसेना पक्षाचे नेते तुषार वेल्लापल्ली हेसुद्धा जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. बैठकीमध्ये सुरुवातीला हरयाणा, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आणि उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीत एनडीएला मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन केलं जाईल. त्यानंतर वन नेशन वन इलेक्शन आणि डॉ. आंबेडकर यांच्या अवमानाचा मुद्दा तसेच इतर मुद्यांवर चर्चा करून एनडीएमधील नेते एका सूरामध्ये आपलं म्हणणं मांडतील.
एनडीएच्या आधीच्या बैठकीमध्ये एनडीएचे सर्व नेते महिन्यातून एकदा बैठक घेतील, असं निश्चित झालं होतं. मात्र हरयाणा, महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकीच्या व्यस्ततेमुळे ही बैठक होऊ शकली नव्हती.