नवी दिल्ली - खरी शिवसेना कुणाची या खटल्यावर उद्या म्हणजे ८ ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत गेल्या ३ वर्षापासून सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होती. यात अंतिम सुनावणी ८ ऑक्टोबरला होणार आहे. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सुप्रीम कोर्ट निकाल देईल. या निकालाकडे महाराष्ट्रासह अख्ख्या देशाचे लक्ष लागून आहे.
याबाबत वकील असीम सरोदे म्हणाले की, शिवसेना धनुष्यबाण चिन्हाबाबत उद्या अंतिम सुनावणी घेणार असे सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केले आहे. दिनांक ८ ऑक्टोबरला न्यायाधीश सूर्यकांत नक्की सुनावणी घेतील अशी अपेक्षा आहे. इकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी बांधून तयार नसलेल्या विमानतळाचे नवी मुंबईत दिखाऊ उद्घाटन करणार आणि त्याचवेळी संविधानासोबत अनैतिकता करून सत्तेच्या हवेत असलेल्या एकनाथ शिंदे यांचे विमान सर्वोच्च न्यायालय जमिनीवर पाडणार का? लवकरच कळेल असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.
न्या. सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोरच शिवसेना चिन्ह आणि नावाचा खटला सुरू आहे. १९ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या काळात राष्ट्रपती आणि राज्यपाल वादावर घटनापीठाची सुनावणी होणार होती त्यामुळे हा खटला लांबणीवर पडला होता. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील काही महिन्यात पार पडतील. त्याआधीच खरी शिवसेना कुणाची हा निकाल सुप्रीम कोर्ट देणार आहे. त्यामुळे धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे कायम राहणार की ते पुन्हा उद्धव ठाकरे यांना मिळणार हे सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, दीर्घ काळ न्यायप्रविष्ट असलेल्या शिवसेना नाव आणि चिन्हाच्या खटल्यावर लवकर सुनावणी घेऊन निर्णय द्या अशी याचिका उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. त्यावर १४ जुलैला सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. ही सुनावणी करताना न्या. सूर्यकांत, न्या. बागची यांच्या खंडपीठाने मुख्य याचिकेवर सुनावणी करणे योग्य राहील असं सांगत ऑगस्टमध्ये यावर सुनावणी घेऊ असं स्पष्ट केले होते. मात्र राष्ट्रपती-राज्यपाल वादातील खटल्यामुळे ही सुनावणी लांबणीवर पडली. या प्रकरणाला २ वर्ष झाली असून त्याचा सोक्षमोक्ष लावायचा आहे असे संकेतच सुप्रीम कोर्टाने मागील सुनावणीत दिले होते.
Web Summary : Supreme Court to deliver final verdict on Shiv Sena name, symbol dispute. Crucial hearing on October 8. All eyes are on the decision's impact on upcoming local elections. The court aims to resolve the two-year-long legal battle.
Web Summary : सुप्रीम कोर्ट शिवसेना के नाम, प्रतीक विवाद पर अंतिम फैसला देगा। 8 अक्टूबर को महत्वपूर्ण सुनवाई। आगामी स्थानीय चुनावों पर निर्णय के प्रभाव पर सबकी निगाहें हैं। अदालत का लक्ष्य दो साल की कानूनी लड़ाई को हल करना है।