CDS Anil Chauhan News: ऑपरेशन सिंदूरवेळी अत्याधुनिक ड्रोनचा झालेला वापर आणि संरक्षण क्षेत्रातील बदलत्या तंत्रज्ञानाबद्दल भारताचे सीडीएस प्रमुख अनिल चौहान यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. कालच्या शस्त्रांच्या बळावर आजचे युद्ध जिंकले जाऊ शकत नाही, असे म्हणत त्यांनी या क्षेत्रात मोठी गुंतवणून करण्याची गरज असल्याचा मुद्दा मांडला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सीडीएस प्रमुख अनिल चौहान नवी दिल्लीत बुधवारी (१५ जुलै) यूएव्ही आणि सी यूएएस या विषयावरील कार्यशाळेत बोलत होते.
सध्याच्या काळात युद्ध अत्याधुनिक शस्त्रांच्या मदतीने लढले जात असल्याच्या मुद्द्यावर त्यांनी भर दिला. भविष्यात जे युद्ध होतील, त्यामध्ये ड्रोन आणि मिसाईलचा वापर केला जाऊ शकतो असेही चौहान म्हणाले.
सीडीएस प्रमुख म्हणाले, ऑपरेशन सिंदूरने आपल्याला दाखवले की...
कार्यशाळेत बोलताना सीडीएस प्रमुख अनिल चौहान म्हणाले, "ऑपरेशन सिंदूरने आपल्याला दाखवले की, आपल्या भूभागासाठी स्वदेशी बनावटीची मानवरहित एअर डिफेन्स सिस्टिम का महत्त्वाची आहे. आपल्याला आपल्या संरक्षणासाठी गुंतवणूक करावी लागेल. ऑपरेशन सिंदूरच्या काळात १० मे रोजी पाकिस्तानने बिना शस्त्र असणाऱ्या ड्रोनचा वापर केला होता. त्यातील कोणत्याही ड्रोनने भारतीय लष्कराच्या किंवा नागरिक वसाहतीचे नुकसान केले नाही. बहुतांश ड्रोन्स हवेतच उद्ध्वस्त करण्यात आले. काही ड्रोन्स तर व्यवस्थित अवस्थेत सापडले", असे चौहान म्हणाले.
ड्रोनमुळे युद्धाचे स्वरुप बदलले
सीडीएस चौहान म्हणाले, "भविष्यात होणाऱ्या युद्धांमध्ये ड्रोनचा वापर वाढेल. जेव्हा आपण ड्रोनबद्दल बोलतो, तर तुम्हाला काय वाटतं? ड्रोन युद्धाचे स्वरुप बदलून टाकत आहेत का? मला वाटते की, युद्धामध्ये यांचा वापर खूपच क्रांतिकारी आहे. जसे जसे यांचे स्वरुप व्यापक होत गेले, तसे तसे लष्कराने क्रांतिकारी पद्धतीने त्याचा वापर सुरू केला आहे."
अनिल चौहान म्हणाले, "परदेशातील तंत्रज्ञानावर अवलंबून राहणे, तयारी कमकुवत करते. आजचे युद्ध हे कालच्या शस्त्रांनी जिंकता येऊ शकत नाही. आजच्या युद्धासाठी नवीन तंत्रज्ञान गरजेचे आहे. कारण आजचे युद्ध हे उद्याच्या तंत्रज्ञानांशी लढावे लागणार आहे. तेव्हाच युद्ध जिंकले जाऊ शकते", असे चौहान यावेळी म्हणाले.