Today, September 15, Doordarshan celebrates 60 years of bringing television to India | दूरदर्शन दिन : छतावर बसवलेला टीव्ही अँटिना बनला प्रतिष्ठेचे प्रतीक
दूरदर्शन दिन : छतावर बसवलेला टीव्ही अँटिना बनला प्रतिष्ठेचे प्रतीक

- भाग्यश्री डहाळे

घरबसल्या जगाचा वृत्तांत देणाऱ्या महाभारतकालीन संजयचा ‘दूरदर्शन’ हा दृश्य अवतार. Television या शब्दाचा उगम ग्रीक शब्द Tele म्हणजे ‘दूरचे’ आणि लॅटिन शब्द vision म्हणजे ‘दृश्य’ या दोन शब्दांच्या संगमातून झाला आहे आणि त्याला अतिशय समर्पक भारतीय नाव आहे - दूरदर्शन.

इंटरनेट आणि डिजिटल क्रांतीच्या युगात जगणाऱ्या या पिढीला दूरदर्शनचा अर्थ कदाचित माहितही नसेल. परंतु जुन्या पिढीतील प्रेक्षकांचे नाते दूरदर्शनसोबत दृढ नाते राहिले आहे. १९५९ मध्ये सरकारी योजनांच्या प्रसारणासाठी म्हणून दूरदर्शनची स्थापना झाली. छोट्याशा पडद्यावर चालती-बोलती चित्रे दाखवणारा विजेवर चालणारा डब्बा सर्वांसाठी कुतुहलाचा विषय होता. माणसे टीव्हीमध्ये जाऊन कशी काय नाचतात, बोलतात याचे तेव्हा कुतुहल वाटे. सुरुवातीला तर लोक समजायचे टीव्हीच्या डब्ब्यामध्येच छोटी-छोटी माणसे आहेत जी टीव्हीचालू केला की, आपल्याला दिसतात. ज्याच्या घरी टीव्ही होता, त्याच्याकडे दूरवरून लोक बघायला यायचे. छतावर बसवलेला टीव्ही अँटिना त्या काळात प्रतिष्ठेचे प्रतीक बनला होता. देशातील कला आणि संस्कृतीशी संबंधित कार्यक्रमांची या सरकारी वाहिनीवर रेलचेल असायची.

१९५९ मध्ये दूरदर्शनचा पहिला कार्यक्रम प्रसारित केला गेला. या अर्ध्या तासाच्या प्रसारणात शैक्षणिक आणि विकासात्मक कार्यक्रम दाखविण्यात आला. कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकसंख्या नियंत्रण, कुटुंब कल्याण, महिला-मुले आणि विशेषाधिकाररहित वर्गातील समाजाच्या कल्याणासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना सामान्यांपर्यंत पोहोचवणे हा दूरदर्शन सुरू करण्यामागचा उद्देश आहे. दूरदर्शनच्या सुरुवातीच्या काळात काही वेळेपुरतेच कार्यक्रमांचे प्रसारण केले जायचे. ऑल इंडिया रेडिओचा एक भाग म्हणून दूरदर्शनवर नियमित दैनिक प्रसारणांची सुरुवात १९६५ मध्ये करण्यात आली. १९७२ मध्ये ही सेवा मुंबई म्हणजे तत्कालिन बंबई आणि अमृतसरपर्यंत विस्तारित केली गेली. १९७५ पर्यंत भारतातील फक्त ७ शहरांमध्ये टीव्ही सेवा होती आणि दूरदर्शन ही भारतातील टीव्ही सेवा देणारी एकमेव कंपनी होती. जी आज देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचली आहे.

१ एप्रिल १९७६ रोजी टीव्ही सेवा रेडिओपासून विभक्त करण्यात आल्या. ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनचे कार्यालय दिल्लीत स्वतंत्र महासंचालकांनी सांभाळले. राष्ट्रीय प्रसारणांची सुरुवात मात्र १९८२ मध्ये झाली. आतापर्यंत ब्लॅक अँड व्हाईट असलेले दूरदर्शन यावर्षीपासून रंगीत झाले. १९८२ मध्ये दूरदर्शन राष्ट्रीय प्रसारक म्हणून अस्तित्वात आले आणि देशाच्या सर्व भागांत पोहोचले. दूरदर्शनवर प्रसारित होणारा कृषी दर्शन कार्यक्रम २६ जानेवारी १९६७ रोजी सुरू झाला आणि हा सर्वात प्रदीर्घ काळ चाललेला टीव्ही कार्यक्रम ठरला.

हम लोग, ये जो है जिंदगी, बनियाड, रामायण, महाभारत, शक्तिमान, भारत एक खोज, चित्रहार,  छायागीत, करमचंद, व्योमकेश बक्षी, विक्रम और बेताल, मालगुडी डेज, ओशिन (एक जपानी टीव्ही मालिका), जंगल बुक, अलिफ लैला, पीकॉक कॉल आणि युनिव्हर्सिटी गर्ल्स (माहितीपट) हे दूरदर्शनवरील काही लोकप्रिय टीव्ही कार्यक्रम होते. सध्या दूरदर्शनचे २१ चॅनल्स कार्यरत आहेत. त्यापैकी दोन डीडी नॅशनल आणि डीडी न्यूज, ११ प्रादेशिक भाषेचे उपग्रह चॅनेल आणि स्पोर्ट्स चॅनेल्स (डीडी स्पोर्ट्स), चार राज्य नेटवर्क, राज्यसभा आणि लोकसभा टीव्ही-ज्याद्वारे संसदेचे थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळते. डीडी नॅशनल (डीडी 1 म्हणूनही ओळखले जाते) हे प्रादेशिक आणि स्थानिक कार्यक्रमांचे प्रसारण करते. डीडी न्यूज ही वृत्तवाहिनी आहे. प्रादेशिक भाषेचे उपग्रह चॅनेल दोन भागांत विभागले गेले आहेत; त्या विशिष्ट राज्यासाठी प्रादेशिक सेवा आणि केबल ऑपरेटरद्वारे प्रादेशिक भाषा प्रोग्राम उपलब्ध आहेत. डीडी स्पोर्ट्स हे एकमेव चॅनेल आहे जे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे प्रसारण करते.

काही सक्रिय दूरदर्शन वाहिन्या म्हणजे डीडी काश्मिरी, डीडी गुजराती, डीडी पंजाबी आणि डीडी चंदना. दूरदर्शनमध्ये डीडी डायरेक्ट प्लस नावाची सेवा देखील आहे जी विनामूल्य डीटीएच सेवा आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही उपग्रहाद्वारे दूरदर्शन इंडियाचे जगभरात १४६ वाहिन्यांद्वारे प्रसारण केले जाते. १९५९ च्या सुरुवातीच्या काळापासून आतापर्यंत दूरदर्शन जागतिक पातळीवर पोहोचले आहे आणि भूगोलावरील विविध पिढ्यांमधील प्रेक्षकांना माहिती व मनोरंजन देत आहे.
 

Web Title: Today, September 15, Doordarshan celebrates 60 years of bringing television to India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.