मऊ - लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यापूर्वी पश्चिम बंगालमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये आरपारची लढाई सुरू आहे. कोलकाता येथे अमित शहांच्या रोड शोनंतर भाजपा आणि तृणमूलच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी होऊन तिचे रुपांतर हिंसाचारात झाले होते. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांना पुन्हा एकदा आव्हान दिले आहे. आज मी पुन्हा बंगालमध्ये जाणार आहे. पाहुया, आता काय होते ते, असे मोदींनी सांगितले. उत्तर प्रदेशमधील मऊ येथे प्रचारसभेला संबोधित करताना नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील घटनाक्रमाचा उल्लेख केला. ते म्हणाले की, काही महिन्यांपूर्वी मिदनापूर येथील माझ्या सभेदरम्यान तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे मला माझे भाषण थांबवावे लागले होते. आता तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी अमित शहा यांच्यासभेदरम्यान गोंधळ घातला. मात्र आज मी पुन्हा बंगालच्या दौऱ्यावर जात आहे. पाहुया काय होते ते,'' अशा शब्दात नरेंद्र मोदी यांनी तृणमूलला आव्हान दिले.
आज पुन्हा बंगालमध्ये जातोय, पाहुया काय होतं ते! मोदींचे ममतांना आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 15:29 IST