“आम्ही सगळे चोर अन् भाजपावाले संत आहेत का?”; हेमंत सोरेन कारवाईवरून ममतादीदी संतापल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 10:43 IST2024-02-02T10:41:18+5:302024-02-02T10:43:53+5:30
TMC Mamata Banerjee News: हेमंत सोरेन यांच्यावरील कारवाईवरून ममता बॅनर्जी यांनी भाजपावर टीका केली आहे.

“आम्ही सगळे चोर अन् भाजपावाले संत आहेत का?”; हेमंत सोरेन कारवाईवरून ममतादीदी संतापल्या
TMC Mamata Banerjee News: कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने हेमंत सोरेन यांच्यावर अखेर अटकेची कारवाई केली आहे. ईडीकडून अटकेच्या हालचाली सुरू झाल्यानंतर हेमंत सोरेन यांनी राज्यपालांकडे जात मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. राजीनामा देऊन सोरेन हे घरी पोहोचताच ईडीने त्यांना अटक केली. ईडी कारवाईविरोधात हेमंत सोरेन यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. यातच आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी भाजपावर सडकून टीका केली आहे.
या सर्व घडामोडींमुळे झारखंडमध्ये राजकीय संकट उभे राहिले आहे. हेमंत सोरेन हे राजीनामा देणार असल्याचे निश्चित झाल्यानंतर सत्ताधारी पक्षाने नवे मुख्यमंत्री म्हणून चंपई सोरेन यांचे नाव निश्चित केले. तसेच राज्यपालांकडे सरकार बनवण्यासाठीचा दावाही सादर केला होता. मात्र राज्यपालांनी नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. यावरून काँग्रेससह इंडिया आघाडीतील नेत्यांनी भाजपा आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
आम्ही सगळे चोर अन् भाजपावाले संत आहेत का?
हेमंत सोरेन यांच्यावर झालेल्या कारवाईबाबत ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया दिली. आम्ही सगळे चोर आहोत का आणि ते सगळे संत लागून गेले का, भाजपावाले सर्वांत मोठे चोर आहेत. आजच्या घडीला ते सत्तेत आहेत, म्हणूनच केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे. उद्या ते सत्तेत नसतील, तेव्हा या सगळ्या गोष्टी थांबतील, या शब्दांत ममता बॅनर्जी यांनी हल्लाबोल केला.
दरम्यान, काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे. राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट करत भाजपावर टीका केली आहे. ईडी, सीबीआय, आयटी या आता सरकारी संस्था राहिलेल्या नाहीत, आता त्या भाजपाच्या विरोधी पक्षांना संपवण्याच्या संस्था बनल्या आहेत. भ्रष्टाचारात बुडालेला भाजपाच सत्तेच्या नशेत लोकशाही नष्ट करण्याचे अभियान राबवत आहे, या शब्दांत राहुल गांधी यांनी टीकास्त्र सोडले.