'तिरुपती विष्णू निवासम' या निवासी परिसरात बुधवारी (९ जानेवारी) रात्री झालेल्या चेंगराचेंगरीत ६ भाविकांचा मृत्यू झाला तर ४० जण जखमी झाले आहेत. वैकुंठ द्वार येथील दर्शनाचे टोकन मिळविण्यासाठी येथे भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी ही चेंगराचेंगरी झाली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कशी झाली चेंगराचेंगरी? -पवित्र वैकुंठ एकादशीच्या पार्श्वभूमीवर हजारो भाविकांनी येथे दर्शन घेण्यासाठी टोकन मिळावे म्हणून गर्दी केली होती. गुरुवारी सकाळी ५ वाजल्यापासून ९ काउंटर्सवर टोकन वाटप करण्यात येणार होते. तिरुपती शहरात आठ ठिकाणी टोकन वितरण केंद्र तयार करण्यात आले आहेत. येथे शुभ मुहुर्तू साधण्यासाठी भाविकांनी आधीपासूनच गर्दी करायला सुरूवात केली. परिणामी बुधरावी सायंकाळच्या सुमारास एका शाळेवरील केंद्रावर गर्दी अनियंत्रित होऊन चेंगराचेंगरी झाली. ज्यात सहा जनांना आपला जीव गमवावा लागला.
जखमी रुग्णालयात दाखल -या दुर्घटनेनंतर, ४० जखमींपैकी २८ जणांना रुईया रुग्णालयात, तर १२ जणांना सीआयएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने ४ भाविकांचा रुईयामध्ये आणि २ भाविकांचा सिम्समध्ये मृत्यू झाला. मृतांमध्ये ५ महिला आणि १ पुरूषाचा समावेश आहे.
अधिक बातम्यांसाठी... - 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!मुख्यमंत्री चंद्राबाबूंनी व्यक्त केला शोक -या घटनेनंतर, मंदिर समितीचे अध्यक्ष बीआर नायडू यांनी परिस्थितीबाबत तातडीची बैठक घेतली. तसेच, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनाही याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी भाविकांचा मृत्यूबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन योग्या त्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.
वैकुंठ एकादशीचा कार्यक्रम - मिळालेल्या माहितीनुसार, १०-१९ जानेवारीदरम्यान वैकुंठ दर्शन सुरू होणार आहे. या कालावधीत लाखो भाविक दर्शनासाठी तिरुपती मंदिरात येतील. यासाठी तिरुपती मंदिर ट्रस्टने संपूर्ण तयारीही केली आहे. टीटीडीने गुरुवारपासून तिरुपतीमधील ९ केंद्रांमध्ये ९४ काउंटर्सवर वैकुंठ द्वार येथील दर्शनाचे टोकन देण्याची व्यवस्था केली आहे.